सध्याच्या जमान्यात अनेक कलाकार निर्माते बनतात, तर अनेक दिग्दर्शक. साहजिकच आहे, कारण अनेक चित्रपटांतून कामं करीत असताना चित्रपटाविषयीच्या अनेक अंगांची माहिती होत असते. रितेश देशमुख (Riteish Deshmukh) हा प्रामुख्याने हिंदीत चमकणारा स्टार. परंतु त्याने ‘लय भारी’ मधून मराठीत पदार्पण करताना अभिनयासोबतच त्या चित्रपटाची निर्मितीही केली होती. त्याची प्रमुख भूमिका असलेल्या ‘माउली’ नंतर आता तो एक नवीन चित्रपट घेऊन येतोय आणि त्या चित्रपटाचे नाव आहे ‘वेड’. रितेश त्यात प्रमुख भूमिका करीत असून, निर्मितीही त्याचीच आहे. परंतु एक पाऊल पुढे टाकत रितेश ‘वेड’ चे दिग्दर्शनही करतोय. आजच या चित्रपटाचा मुहूर्त संपन्न झाला. मुहुर्तावेळी संपूर्ण देशमुख कुटुंबीय उपस्थित होतं आणि रितेशची आई वैशाली देशमुख यांनी मुहूर्ताचा क्लॅप (Clap) दिला तर मुलाने अॅक्शन (Action) म्हणत शूटिंगला सुरुवात करण्यात आली.
२० वर्ष अभिनय कारकीर्द गाजवल्यानंतर अभिनेता रितेश देशमुख एका आगळ्या वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मुंबई फिल्म कंपनीने आज ६ व्या मराठी चित्रपटाची घोषणा (Mumbai Film Company announces Marathi film) केली आणि या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिनेता रितेश देशमुख करणार आहेत तसेच विशेष बाब म्हणजे या चित्रपटा द्वारे अभिनेत्री जेनेलिया देशमुख (Genelia Deshmukh's debut in Marathi film) या मराठी चित्रपटात पदार्पण करत आहेत. या पूर्वी जेनेलिया यांनी हिंदी ,तेलगू ,तमिळ ,कन्नड आणि मल्याळम अशा तब्बल ५ भाषिक चित्रपटांमध्ये काम केले आहे तसेच अभिनेत्री जिया शंकर या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका साकारत आहे. हा चित्रपट संगीतप्रधान असून अजय अतुल संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळणार आहेत.