मुंबई - आपल्या खऱ्या चेहऱ्यावर रंगरंगोटी करून समोर आलेला दुसरा चेहरा म्हणजे मेकअप. हा मेकअप केवळ चेहऱ्याचाच असतो असं नाही. हा मेकअप व्यक्तिमत्वाचाही असू शकतो. आता व्यक्तिमत्वाचा मेकअप कसा असेल, हा प्रश्न जर तुमच्या डोक्यात आला असेल, तर याचे उत्तर तुम्हाला लवकरच मिळणार आहे. गणेश पंडित दिग्दर्शित 'मेकअप' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'मेकअप'च्या जबरदस्त टिझरनंतर आता या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर झळकले आहे.
या पोस्टरमध्ये काचेच्या इमारतीजवळ पारंपरिक वेशात उभ्या असणाऱ्या रिंकू राजगुरूचे प्रतिबिंब एका वेगळ्याच वेशात दिसत आहे. कधी कधी माणसाचे प्रतिबिंब हे त्यांच्या मूळ व्यक्तिमत्वापेक्षा जास्त बोलके असते. त्यामुळे समोरची व्यक्तीही संभ्रमात पडते, की नक्की खरं कोण? हे पोस्टर बघून प्रेक्षकांचीही काहीशी अशीच अवस्था झाली असेल. परंतु, जास्त विचार करू नका, कारण यात रिंकूचे दोन वेगळे चेहरे दिसणार आहेत.