मुंबई- शेतकऱ्यांच्या प्रश्नावर प्रकाशझोत टाकत समाजातील वास्तव दाखवण्याचा प्रयत्न ‘फास’ या चित्रपटातून करण्यात आला आहे. हा चित्रपट शेतकरी आणि त्यांच्या जीवनशैलीकडे पाहण्याची नवी दृष्टी देणारा ठरणार आहे. सातत्यानं वाढणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या, निसर्गाचं असंतुलन व सरकारी धोरण यांचा शेतकरी व त्यांच्या कुटुंबांवर होणाऱ्या परिणामावर आधारलेली कथा 'फास'मध्ये पहायला मिळणार आहे. कानसह जापान आणि पॅरिस या परदेशांसोबतच राजस्थान व नोएडा या महत्त्वाच्या शहरांमधील सिनेमहोत्सवांमध्ये 'फास'चं खूप कौतुक करण्यात आलं आहे.
या चित्रपटातील छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार करणारे एक धडाकेबाज आणि अतिशय महत्त्वाचं गाणं नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं आहे. शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर या गाण्याचा 'फास'मध्ये समावेश करण्यात आला आहे. 'जी जी रं जी जी...' असं म्हणत सुरू होणारं हे गाणं शिवजन्माचं वर्णन करणारं आहे. हे गाणं गीतकार अमोल देशमुख यांनी लिहिलं असून, संगीतकार ॲलन के. पी. यांनी अवधूत गुप्ते आणि शेख निशांत या गायकांच्या आवाजात ध्वनीमुद्रीत केलं आहे. 'शिवनेरीवर शिवशक्तीचं तेज जन्मलं आज...' असा या गाण्याचा मुखडा ऐकता क्षणीच स्मरणात राहणारा आहे. या गाण्यात महाराजांचा भगवा डौलानं फडकताना दिसतोच, पण शिवरायांची सुंदर मूर्तीही लक्ष वेधून घेते.
कमलेश सावंत या प्रमुख कलाकारावर हे गाणं चित्रीत करण्यात आलं आहे. गाण्याच्या सुरुवातीला खाकी वर्दीत राष्ट्रीय पारितोषिक विजेता अभिनेता उपेंद्र लिमयेही दिसतो. त्यानंतर गाणं सुरू होतं. ढोल-ताशांच्या निनादात छत्रपती शिवाजी महाराजांचे गोडवे गाणारं हे गाणं चित्रीत आणि ध्वनीमुद्रीत करण्यात आलं आहे. ढोल ताशांच्या जोडीला अस्सल मराठमोळं लेझीम नृत्यही यात आहे. या जोडीला तलवारबाजी, दांडपट्टा या साहसी खेळांसोबतच महाराष्ट्राची ओळख असलेली फुगडीही यात दिसते.