चित्रपटांतून प्रेम ही भावना वेगळं न करण्यासारखी आहे. अर्थातच प्रेयसी-प्रियकर चे प्रेम हा सर्वभाषिक चित्रपटांचा गाभा राहिला आहे. असंख्य कवी-साहित्यिकांनी आपापल्या भाषांमध्ये प्रेमाच्या नानाविध व्याख्या मांडण्याचा प्रयत्न केला आहे, पण हे प्रेम नेमकं असतं तरी कसं हे विचारलं तर ते कोणालाही ठामपणे सांगता येणं शक्य नाही. कारण प्रेम ही भावना आहे, ज्याचा अनुभव प्रत्येकजण आपापल्या परीनं घेत असतो. प्रत्येकाचं प्रेम अद्वितीय असते आणि खास असते. त्यामुळं वरवर पाहता प्रेम जरी सोपं वाटत असलं तरी ते सोपं मात्र अजिबात नाही.
या सोपं न वाटणाऱ्या प्रेमावर आधारित एक मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘तुमाला वाटतंय पण सोपं नायी… ‘ अशी टॅगलाईन असलेल्या या मराठी चित्रपटाचं शीर्षक 'लगन' असं आहे. या चित्रपटाचा टिझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटाचं लेखन-दिग्दर्शन अर्जुन गुजर यांनी केलं आहे. प्रेम म्हणजे एक गुलाबी अनुभूती... आपल्या आवडत्या व्यक्तीच्या विचारांत रमणं...आपल्याच विश्वात हरवून जाणं... तहान-भूक हरपणं... अशी काहीशी प्रेमाची लक्षणं सांगितली जातात. ही प्रेमाची एक बाजू झाली, पण प्रत्येक नाण्याला जशा दोन बाजू असतात तशाच प्रेमालाही आहेत. प्रेम करणं ते टिकवणं आणि निभावणं या गोष्टी वाटतात तितक्या सोप्या मुळीच नाहीत.