सध्या आपला क्रिकेटचा हंगाम क्रिकेटप्रेमींना रिझवतोय. भारत हा क्रिकेटप्रेमींचा देश तसेच चित्रपट बघणाऱ्यांचादेखील. आता क्रिकेट आणि चित्रपट मनोरंजन एकत्र आले तर ते प्रेक्षकांना किती आवडेल याचा विचारच केलेला बरा. परंतु मराठी प्रेक्षकांना अशी पर्वणी मिळणार आहे, ‘फ्री हिट दणका’ या चित्रपटातून. अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना क्रिकेटचे वेड आहे. याच क्रिकेटवर आधारित 'फ्री हिट दणका' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. क्रिकेटमधील संघर्ष, चुरस, उत्सुकता, डावपेच तसेच ग्रामीण भागातील रांगडेपणा, ग्रामीण भाषेतील लहेजा हे सर्व प्रेक्षकांना या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे.
उघडेवाडी आणि निगडेवाडी या दोन गावातील नेत्यांमधील वैमनस्यातून क्रिकेटच्या मॅचचे आयोजन केले जाते. या मॅचचा विजेता नक्की कोण ठरतो, या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये नायकाच्या प्रेमाचा बळी जातो का, या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी प्रेक्षकांना या चित्रपटाची वाट पाहावी लागणार आहे. एसजीएम फिल्म्स प्रस्तुत 'फ्री हिट दणका' या चित्रपटात अपूर्वा एस. हिच्यासह 'सैराट' चित्रपटातील सुपरहिट जोडी अरबाज (सल्या) आणि तानाजी (लंगड्या), सुरेश विश्वकर्मा, अनिल नगरकर, गणेश देशमुख यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.