मुंबई- रविना टंडन लहान असताना ऋषी कपूर सुपरस्टार होते. रोमँटीक सिनेमे करून चाहत्यांच्या मनावर राज्य करत होते. मात्र, काही वर्षांनी रविना टंडन ऋषी कपूरसोबत चित्रपटात झळकली. रविनाने ऋषी कपूर यांच्या निधनानंतर त्यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे. तसेच रविनाने तिचे वडील चित्रपट निर्माते रवी टंडन यांचे ऋषी कपूर यांच्यासोबतच्या आठवणीदेखील चाहत्यांशी शेअर केल्या. ऋषी कपूर यांचे ३० एप्रिलला मुंबईत निधन झाले.
मी ऋषी कपूर यांच्यासोबत खूप चित्रपटांमध्ये काम केलेलं नाही. मात्र माझ्या वडिलांनी त्यांच्यासोबत अनेक चित्रपट केले. मी अगदी लहान असल्यापासून त्यांना बघत आले. मी ऋषीजींच्या डोळ्यांसमोर मोठी झाली, असे रविना सांगते. ऋषीजींचं जाणं ही माझ्या वडिलांसाठी कधीही न भरून निघणारी पोकळी आहे. माझ्या वडिलांनी त्यांच्या अगदी जवळचा एक मित्र गमावलायं असे रविनाने सांगितले. पुढे ऋषीजींच्या आठवणी सांगताना रविना सांगते की मला अजूनही आठवतयं की माझे वडील, पंचम अंकल म्हणजेच आरडी बर्मन, रमेश बेहेल अंकल आणि ऋषीजी सोबत मिळून मजा करायचे. त्यांच्या जाण्याने माझ्या वडिलांना खूप मोठा धक्का बसलाय.