मुंबई -'झी मराठी' वाहिनीवरील 'रात्रीस खेळ चाले' या मालिकेने अल्पावधीतच लोकप्रियतेचे शिखर गाठले आहे. या मालिकेतील अण्णा या व्यक्तिरेखेला प्रेक्षक आणि चाहत्यांचा भरभरुन प्रतिसाद मिळतो. या मालिकेतील अण्णाची भूमिका साकारणारे अभिनेते माधव अभ्यंकर यांनी मागील वर्षापासून एका चांगल्या कामासाठी पुढाकार घेतला आहे. त्यांच्या पुढाकाराने प्रजासत्ताक दिनी सैनिकांना मदत करता येणार आहे.
'रात्रीस खेळ चाले २'च्या सेटवर ड्रॉप बॉक्स ठेवण्यात आले आहेत. यात जमा झालेला निधी सैनिकांच्या मदतीसाठी पाठवला जाणार आहे. या मालिकेचे शूटिंग पाहण्यासाठी येणाऱ्या प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असल्यामुळे आता तिसरा ड्रॉप बॉक्स ठेवण्यात आला आहे.
सावंतवाजीपासून अवघ्या ५ ते ६ किमी अंतरावर असलेल्या आकेरी या गावात या मालिकेचे शूटिंग सुरू आहे. अण्णा नाईक आणि शेवंतासह सर्व कलाकारांना पाहण्यासाठी व त्यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी सेटवर नेहमीच गर्दी होत असते. या गर्दीच्या सहभागाने आपल्या देशातील सैनिकांसाठी काही करता आले तर? अशी कल्पना माधव अभ्यंकर यांना सुचली.
गेल्यावर्षी जानेवारीपासून त्यांनी सेटवर ड्रॉप बॉक्स ठेवायला सुरुवात केली. ‘सेल्फी फॉर सेल्फ रिस्पेक्ट, सैनिकहो तुमच्यासाठी!’ असे या ड्रॉप बॉक्सवर लिहिले आहे. मी तुमच्यासोबत सेल्फी काढेन, पण आपल्या सैनिकांसाठी शक्य ती मदत करा, असे आवाहन अभ्यंकर यांनी चाहत्यांना केलं आणि पाहता पाहता या ड्रॉप बॉक्स मध्ये जवळपास लाखभर रुपयांचा निधी जमा झाला आहे. फॅन्सनीदेखील त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले असून अगदी ५० रुपयांपासून ५०० रुपयांपर्यंत त्यांनी आपल्या परीने सैनिकांसाठी मदत केली.