मुंबई -अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या 'छपाक' चित्रपटाची बऱ्याच दिवसापांसून चर्चा सुरू होती. अॅसिड हल्ल्यासारख्या गंभीर विषयावर आधारित हा चित्रपट आहे. या चित्रपटाबाबत बरेच वादविवादही निर्माण झाले. मात्र, अखेर आज (१० जानेवारी) हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट पाहून रणवीर सिंगने भावूक होत सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे.
रणवीरने 'छपाक'च्या संपूर्ण टीमचे कौतुक केले आहे. दिग्दर्शिका मेघना गुलजार यांनी एवढा गंभीर विषय चांगल्या प्रकारे हाताळल्याबद्दल रणवीरने त्यांची प्रशंसा केली आहे. तर, दीपिकाच्या अभिनयाचेही त्याने कौतुक केले आहे.
हेही वाचा -'स्ट्रीट डान्सर थ्रीडी'चं नवं गाणं 'दुआ करो'
'छपाक' हा चित्रपट अॅसिड हल्ल्यातून बचावलेल्या लक्ष्मी अग्रवालच्या जीवनावर आधारित आहे. यामध्ये लक्ष्मी आपल्यावर झालेल्या हल्ल्यानंतर कशाप्रकारे धैर्याने सर्व गोष्टींना सामोरी जाते, हे दाखवण्यात आले आहे. दीपिका पदुकोणने तिची भूमिका साकारली आहे.
या चित्रपटातील फर्स्ट लूकपासूनच चित्रपटाची चर्चा होती. रणवीरने दीपिकाच्या लूकसोबतच तिच्या अभिनयाची प्रशंसा केली आहे. हा चित्रपट तिच्या करिअरमधला सर्वात महत्त्वाचा चित्रपट असल्याचेही त्याने म्हटले आहे. 'मला तुझा खूप अभिमान वाटतो', असे म्हणून त्याने दीपिकाप्रती आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
हेही वाचा -हॅप्पी बर्थडे हृतिक रोशन : डान्स मुव्ह्जचा जादूगर
'छपाक' चित्रपटात विक्रांत मेस्सीचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे. अलीकडेच मध्य प्रदेश आणि छत्तीसगड राज्य सरकारने 'छपाक' चित्रपट करमुक्त दाखवण्याची घोषणा केली आहे.