मुंबई - बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या 'ब्रम्हास्त्र' चित्रपटाचा अलिकडेच लोगो प्रदर्शित करण्यात आला आहे. मात्र, हा लोगो निश्चित करण्यापूर्वी चित्रपटाचे तब्बल ३० लोगो नाकारण्यात आले होते. तसेच, रणबीर कपूरचाही सुरुवातीचा लूक रिजेक्ट झाला होता. दिग्दर्शक अयान मुखर्जीने हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
'ब्रम्हास्त्र' चित्रपटाची बऱ्याच काळापासून चर्चा सुरु आहे. मात्र, सुरुवातीला या चित्रपटाचे नाव 'ड्रॅगन' असे ठेवण्यात आले होते. त्यानंतर हे बदलून 'ब्रम्हास्त्र' असे ठेवण्यात आले. अयान मुखर्जीने चित्रपटाचे सुरुवातीच्या लोगोचेही फोटो शेअर केले आहेत. रणबीरचाही एक फोटो शेअर करून त्याने त्याचा सुरुवातीचा लूक का नाकारला त्याबद्दल सांगितले आहे.
रणबीरच्या बऱ्याच लूक्सची टेस्ट घेण्यात आली होती. त्यानंतर एक लूक निश्चित करण्यात आला होता. या लूकमध्ये त्याचे केस वाढलेले दिसत आहेत. तसेच त्याच्या चेहऱ्यावर एक निशानदेखील दिसत आहे. 'त्याच्या पात्राचे नाव 'रुमी' असे देण्यात आले होते. नंतर हे नाव बदलून 'शिवा' असे देण्यात आले आहे. मात्र, त्यानंतर आम्हाला रणबीरचा दुसरा लूक आवडला आणि चित्रपटाचीही दुसरी कल्पना तयार करण्यात आली. त्यामुळे त्याचा सुरुवातीचा लूक रिजेक्ट करण्यात आला', असे अयान मुखर्जीने या पोस्टमध्ये लिहिले आहे.
'ब्रम्हास्त्र' चित्रपटात अमिताभ बच्चन हे देखील मुख्य भूमिकेत झळकणार असल्यामुळे प्रेक्षकांना या चित्रपटाबद्दल उत्सुकता आहे. अयान मुखर्जीचे इन्स्टाग्रामवरही पदार्पण झाले आहे. त्यामुळे सोशल मीडियावर या चित्रपटाबद्दलच्या ताज्या घडामोडी आता चाहत्यांना पाहायला मिळतील. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल.