महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

गोपीचंद पडळकरांचा 'धुमस' सिनेमा 'सैराट'चा रेकॉर्ड ब्रेक करेल - राम शिंदे - dhumas

आता 'धुमस' हा सिनेमा सैराट एवढा चालेल की नाही माहीत नाही, पण गोपीचंद पडळकर आणि उत्तमराव जानकर यांना आपल्या खिशात ठेवायला या स्तुतीचा निश्चितच उपयोग होईल एवढं नक्की

धुमस सिनेमाचा ट्रेलर लाँच सोहळा

By

Published : Mar 16, 2019, 1:44 PM IST

मुंबई- 'धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांचा 'धुमस' हा सिनेमा 'सैराट'चाही रेकॉर्ड ब्रेक करेल' असे वक्तव्य राज्याचे जलसंधारण आणि रोजगार हमी योजना मंत्री राम शिंदे यांनी केलं आहे. निमित्त होत ते पडळकर यांचे सिनेपदार्पण होत असलेल्या 'धुमस' या सिनेमाच्या ट्रेलर आणि म्युझिक लाँच सोहळ्याचे. नुकत्याच लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत. अशात कोणत्याही घटकाला दुखावणे सत्ताधारी पक्षाला झेपणार नाही. त्यामुळेच गोपीचंद पडळकर आणि उत्तमराव जानकर यांच्या सिनेमाच्या ट्रेलर लाँच सोहळ्याला येणे मंत्री राम शिंदे यांनी लगेच मान्य केले.

धुमस सिनेमाचा ट्रेलर लाँच सोहळा


खरं तर धनगर समाजाच्या मनातली 'धुमस' या सिनेमातून मांडण्याचा प्रयत्न या दोघांनी केल्याचे शिंदे यांनी आवर्जून सांगितले. तर धनगर समाजाच्या आरक्षणाची मागणी अजून संपलेली नाही, अशावेळी जनतेच्या प्रश्नासाठी शासनाशी दोन हात करण्याऐवजी आपले नेते सिनेमात मारामारी आणि हिरोईन भोवती पिंगा का घालतात, अशी टीका होण्याची शक्यता आहे. मात्र, आपल्या समाजाचे प्रश्न तळागाळातील लोकांपर्यंत आणि आपल्या विरोधकापर्यंत पोहोचावे म्हणून हा सिनेमा बनवून त्यात स्वतः काम केल्याचं उत्तमराव आणि गोपीचंद यांनी सांगितलं.

भाजपचा सगळा भर सध्या बेरजेचे राजकारण करण्याकडे आहे. त्यामुळेच राम शिंदे यांनी या दोघांची मनधरणी करण्यासाठी या सिनेमाची तुलना थेट 'सैराट' सोबत केली. आता 'धुमस' हा सिनेमा सैराट एवढा चालेल की नाही माहीत नाही, पण गोपीचंद पडळकर आणि उत्तमराव जानकर यांना आपल्या खिशात ठेवायला या स्तुतीचा निश्चितच उपयोग होईल एवढं नक्की. तसंही कलाप्रिय महाराष्ट्राला नेत्यांनी सिनेमात काम करण्याची मोठी परंपरा आहे. यापूर्वी विदर्भवादी नेते जांबुवंतराव थेटे, रामदास आठवले, छगन भुजबळ, शिवसेनेचे दिवंगत नेते प्रमोद नवलकर आणि मनसेचे माजी आमदार नितीन सरदेसाई यांनी सिनेमात छोटे मोठे रोल केले आहेत. अशात गोपीचंद पडळकर आणि उत्तमराव जानकर यांच्या रुपात नेतेच सिनेमाचे हिरो बनून समोर आले तर आश्चर्य वाटायला नको.

ABOUT THE AUTHOR

...view details