मुंबई -बॉलिवूडची 'कॉन्ट्रोवर्सी क्विन' म्हणून ओळखली जाणारी राखी सावंत अखेर लग्नबेडीत अडकली आहे. काही दिवसांपूर्वी तिचे ब्रायडल लूकमधले फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर तिच्या लग्नाच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र, राखीने हे वृत्त फेटाळत हे फोटो फक्त एक ब्रायडल फोटोशूट असल्याचं सांगितलं होतं. आता तिचे आणखी काही फोटो समोर आल्यानंतर तिने अखेर तिच्या लग्न झाल्याचा खुलासा केला आहे.
राखीचे मुंबईच्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये लग्न झाले होते. तिच्या ब्रायडल लूकमधले फोटो देखील समोर आल्यानंतर तिने लग्नाबाबत माहिती देण्यास टाळाटाळ केली होती. आता एका माध्यमाशी बोलताना तिने सांगितले की 'होय, माझे लग्न झाले आहे. एका एनआरआय व्यक्तीशी मी लग्न केले. त्याचे नाव रितेश असे आहे. सर्वांसमोर लग्नाबाबत सांगण्यासाठी मी घाबरत होते. त्यामुळे मी याबाबत कोणालाही सांगितले नाही. माझ्या लग्नात जवळच्या नातेवाईकांचाच समावेश होता. लवकरच मी माझ्या पतीसोबत लंडनला रवाना होणार आहे'.