मुंबई - राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त 'टर्टल' या राजस्थानी चित्रपटाला टॅक्स फ्री करण्याचा निर्णय राजस्थान सरकारने घेतला आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी हा निर्णय जाहीर केला.
६६ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट राजस्थानी चित्रपटाचा पुरस्कार टर्टलला मिळाला होता. मात्र हा चित्रपट रिलीज झाला नव्हता. राजस्थानीत गंभीर पाणी समस्येभोवती चित्रपटाची कथा गुंफण्यात आली आहे.
या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला असला तरी वितरक मिळत नसल्यामुळे चित्रपट रिलीज होऊ शकलेला नव्हता. याबद्दल बोलताना निर्मात्याने खंत व्यक्त केली होती. निर्माता अशोक चौधरी म्हणाले, ''राजस्थानी चित्रपटाच्या इतिहासात पहिल्यांदाच राष्ट्रीय पुरस्कार मिळालाय. जगातील १९५ देशांची गंभीर समस्या असलेल्या पाणी तुटवड्याच्या समस्येवर या चित्रपटाची कथा आहे. आम्ही टॉपचे स्थान मिळवूनही चित्रपटगृहात प्रेक्षक पाहून शकत नाहीत है दुर्दैवी आहे.''
जसे पाण्याचे राज्यात दुर्भिक्ष आहे त्याचा प्रमाणे या चित्रपटाला थिएटर मिळत नव्हते. त्यामुळे चित्रपट रिलीज करणे निर्मात्याला डोकेदुखी झाली होती. राज्य सरकारच्या टॅक्स फ्रीच्या निर्णयामुळे आता रिलीजचा मार्ग सुकर झालाय.
'टर्टल' सिनेमात संजय मिश्रा यांची प्रमुख भूमिका आहे. हा एक राजस्थानी चित्रपट आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी देशभर चित्रपट रसिकांची प्रतीक्षा सुरू आहे. लवकरच रिलीजची तारीख निश्चित होईल ही अपेक्षा आहे.