मुंबई -संगीत क्षेत्रातील सुप्रसिद्ध संगीतकार आर. डी. बर्मन यांनी कंपोज केलेल्या संगीताची धून आजही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवते. हिंदी सिनेसृष्टीत आर. डी. बर्मन यांनी तयार केलेले गाणे आजही सदाबहार आहेत. बालपणापासूनच त्यांनी संगीतक्षेत्रात त्यांचे अमुल्य, असे योगदान दिले आहे. त्यांचे वडील देखील संगीत क्षेत्रातील आघाडीचे संगीतकार होते. त्यामुळे आर. डी. बर्मन यांना घरातूनच संगीताचा वारसा मिळाला होता. वयाच्या अवघ्या ९ व्या वर्षी आर. डी. बर्मन यांनी त्यांची पहिली धून तयार केली होती.
आर. डी. बर्मन यांनी मुंबईमध्ये उस्ताद अली अकबर खान यांच्याकडून सरोद वाद्याचे प्रशिक्षण घेतले होते. तर, समदा प्रसाद यांच्याकडुन तबला वादनाचे धडे घेतले. ते सलिल चौधरी यांना त्यांचे गुरू मानत असत. आर. डी. बर्मन सुरुवातीला ऑर्केस्ट्रामध्ये हारमोनियम वादक म्हणून काम करत असत.