मुंबई - 'चांद्रयान-2' ला चंद्रावर सापडणार नाहीत एवढे खड्डे सध्या कल्याण- शीळ मार्गावर पडलेत. त्यामुळे डोंबिवलीच्या दिशेने येणाऱ्या वाहन चालकांना अक्षरशः नरकयातनाचा सामना करावा लागतोय. याबाबत काही दिवसांपूर्वी स्वतः पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर १५ सप्टेंबर कल्याणमध्ये नाट्य प्रयोगासाठी आलेल्या प्रशांत दामले यांनी त्यावर पोस्ट टाकून आपली नाराजी व्यक्त केली. तर, याच शृंखलेत आता पुष्कर श्रोत्रीच्या नावाचीही भर पडली आहे.
पुष्करने आज त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडिओ पोस्ट करून याबाबत आपली नाराजी व्यक्त केली आहे. १५ सप्टेंबरच्या रात्री साडे आठ वाजता पुष्कर मुख्य भूमिकेत असलेल्या 'अ परफेक्ट मर्डर' या नाटकाचा डोंबिवलीच्या सावित्रीबाई फुले नाट्यगृहात प्रयोग होता. यासाठी विलेपार्ले येथून पोहोचायला आपल्याला सव्वा ३ तास लागले. तर अभिनेता अनिकेत विश्वासराव याला सव्वा ४ तास लागले. हे सगळं फक्त आणि फक्त या रस्त्यावर पडलेले महाकाय खड्डे आणि त्यामुळे झालेल्या वाहतूक कोंडीमुळे झाल्याचं त्याने आपल्या व्हिडीओमध्ये सांगितलं आहे. एवढं करून पूर्ण ताकतीने हा प्रयोग सादर केल्याचं त्याने सांगितलं मात्र रस्त्याच्या दुरवस्थेबाबत शासनाचे औदासिन्य पाहून आपण व्यथित झालो असल्याचं त्याने नमूद केलंय.
हेही वाचा -कल्याणमध्ये नाट्यरसिक उत्तम, रस्ते मात्र थर्ड क्लास; प्रशांत दामलेंची टीका
एवढ्यावरच न थांबता शासन या परिस्तितीबाबत दाखवत असलेलं औदासिन्य पाहून त्याने कडक शब्दात टीकाही केली आहे. मंत्रालय, पालिका मुख्यालय, वर्षा बांगला इथले रस्ते कधीच कसे खराब होत नाहीत मग आमच्याच घराजवळचे रस्ते कसे खराब होतात, याचाच अर्थ त्यासाठी निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले जाते. रस्ते बांधणीतला भ्रष्टाचार सर्वश्रुत आहेच, पण एकदाच काय खायचे ते पैसे खा पण चांगले रस्ते तेवढे बनवून द्या, अशी कडवट टीकाही त्याने या व्हिडीओ द्वारे केली आहे.