मुंबई -'देसी गर्ल' प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन गायक निक जोनास यांनी गतवर्षीच लग्नगाठ बांधली. लग्नापूर्वी त्यांच्या नात्याच्या बऱ्याच चर्चा रंगल्या होत्या. प्रियांका आणि निकच्या वयात तब्बल १० वर्षांचे अंतर आहे. त्यांच्या वयातील अंतरावरून त्यांना सोशल मीडियावर ट्रोलही केलं जातं. मात्र, प्रियांका आणि निक या ट्रोलिंगकडे दुर्लक्ष करून आपले वैवाहिक आयुष्य आनंदाने जगत आहेत.
अलिकडेच एका माध्यमाच्या मुलाखतीत प्रियांकाला तिच्या आणि निकच्या वयातील अंतराबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना प्रियांका म्हणाली, की 'लोक नेहमी आमच्या वयातील अंतरामुळे आम्हाला ट्रोल करतात. एखादा पुरुष त्याच्यापेक्षा लहान महिलेसोबत रोमान्स करत असेल, तर त्याबाबत त्यांना काहीही समस्या नसते. मात्र, तेच जर महिलेबाबत असेल तर लोक त्यांना ट्रोल करतात'.