मुंबई -बास्केटबॉल विश्वातील दिग्गज खेळाडू कोबी ब्रायंटचा हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. ४१ वर्षीय कोबीसह त्याच्या १३ वर्षाच्या मुलीचाही या अपघातात मृत्यू झाला आहे. लॉस एंजलिसपासून ६५ किमी अंतरावर ही दुर्घटना घडली. कलाविश्वातही त्याच्या निधनामुळे हळहळ व्यक्त होत आहे. प्रियांका चोप्रा आणि अक्षय कुमार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून कोबीला आदरांजली वाहिली आहे.
प्रियांका चोप्राने आपल्या इन्स्टास्टोरीमध्ये कोबी ब्रायंटचा फोटो शेअर केला आहे. तसेच, एक पोस्टही लिहिली आहे. 'बास्केटबॉलचा खरा हिरो म्हणूनच कोबी ब्रायंटला मी ओळखत होती. मी अगदी त्याच्या मुलीच्या वयाची असताना त्याने माझी खेळाप्रती प्रेरणा वाढवली होती. त्याने माझ्यासारख्या बऱ्याच पीढींना प्रेरणा दिली होती. त्याच्या प्रेरणेचा हा वारसा हा बॉस्केटबॉलपेक्षाही मोठा आहे. त्याचं आणि त्याच्या मुलीचं निधन हा खूप मोठा धक्का आहे', असे प्रियांकाने या पोस्टमध्ये लिहिले आहे.
प्रियांका चोप्राची कोबी ब्रायंटसाठी भावनिक पोस्ट
प्रियांका चोप्राची कोबी ब्रायंटसाठी भावनिक पोस्ट
हेही वाचा -दिग्गज बास्केटबॉलपटू कोबी ब्रायंटसह त्याच्या मुलीचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू
अक्षय कुमारने त्याच्या पोस्टमध्ये लिहिलंय, की 'निशब्द...जगाने दिग्गज अॅथलेट बास्केटबॉलचा 'द ब्लॅक मॅम्बा' कोबी ब्रायंट आणि त्याची मुलगी जियाना या दोघांनाही गमावले आहे. हेलिकॉप्टरच्या दुर्घटनेत त्यांचा मृत्यू झाला. तू बऱ्याच मुलांसाठी प्रेरणा होतास'.
कोबी ब्रायंटची १३ वर्षाची मुलगी जियानाचा देखील या अपघाताच मृत्यू झाला आहे. लॉस एंजलिसपासून ६५ किमी अंतरावर ही दुर्घटना घडली. कोबीच्या मालकीच्या हेलिकॉप्टरला हवेतच अचानक आग लागली. त्यानंतर, हे हेलिकॉप्टर झाडांमध्ये कोसळले. भयंकर लागलेल्या आगीमुळे बचाव पथकाला मोठ्या अडथळ्यांचा सामना करावा लागला. हा अपघात इतका भीषण होता की हेलिकॉप्टरमध्ये कुणीही वाचू शकले नाही. या अपघातात कोबीसह त्याची मुलगी आणि ९ जण असल्याची माहिती समोर आली आहे.
आपल्या २० वर्षाच्या कारकिर्दीत कोबीने अनेक विक्रम नोंदवले होते. नॅशनल बास्केटबॉल असोसिएशन म्हणजेच एनबीएकडून खेळताना त्याने ५ स्पर्धाही खिशात टाकल्या होत्या. कोबीने १८ वेळा 'एनबीए ऑल स्टार'चा किताब पटकावला होता. २०१६ कोबीने निवृत्ती जाहीर केली. २०१२ आणि २००८ च्या ऑलिम्पिकमध्ये अमेरिकेसाठी कोबीने दोन सुवर्णपदकेही जिंकली होती.