मुंबई -मनोरंजन विश्वातील लोकप्रिय जोड्यांविषयी आपल्या सगळ्यांनाच जाणून घ्यायला आवडते. त्यांचा प्रवास कसा होता? त्यांच्या आठवणी, त्यांची विविध विषयांवरील मत? याबद्दल जाणून घेण्याची प्रेक्षकांना उत्सुकता असते. म्हणूनच अभिनेता जितेंद्र जोशीचा 'कलर्स मराठी'वरील 'दोन स्पेशल' हा कार्यक्रम लोकप्रिय आहे. या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांची लाडकी जोडी प्रिया बापट आणि उमेश कामत हे हजेरी लावणार आहेत.
आजवर 'दोन स्पेशल' कार्यक्रमामध्ये गुरु शिष्याची जोडी, भावंडाची जोडी, मित्रांची जोडी येऊन गेली. मात्र, आता पहिल्यांदाच कार्यक्रमामध्ये पती - पत्नीची जोडी हजेरी लावणार आहे. पुढील आठवड्यामध्ये प्रिया बापट आणि उमेश कामत हे 'दोन स्पेशल'च्या कट्यावर येणार आहेत.