मुंबई - सुशांतसिंह राजपूतच्या निधनाला एक आठवडा पूर्ण झाला आहे. १४ जून रोजी त्याने वांद्रे येथील राहत्या घरामध्ये अखेरचा श्वास घेतला. त्याच्या जाण्याने कुटुंबीयांसोबत फिल्म इंडस्ट्रीला धक्का बसला आहे.
सुशांतच्या आठवणीसाठी कुटुंबीयांनी पाटणा येथे प्रार्थनासभेचे आयोजन केले होते. याच्याशी संबंधित फोटो आणि व्हीडिओ व्हायरल झाला आहे. यात सुशांतचा फोटो फुलांच्या आरासमध्ये सजवलेला दिसतो.
सुशांतच्या घरी प्रार्थनासभेचे आयोजन सुशांतच्या निधनानंतर सोशल मीडियावर चाहत्यांचा रोष पाहायला मिळत आहे. अनेकांनी फिल्म इंडस्ट्रीतील घराणेशाहीच्या विरोधात आपली मते व्यक्त केली आहेत. बॉलिवूडमधील गँगला त्याच्या मृत्यूस जबाबदार धरण्यात येत आहे. त्याला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप केला जात आहे. तर सलमान खान, करण जोहर, एकता कपूरसह अनेकांच्या विरोधात केसही दाखल करण्यात आली आहे. सुशांतची कथित गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीच्या विरोधातही तक्रार दाखल करण्यात आली आहे. याचा तपास मुंबई पोलीस करीत आहे.
अलिकडेच केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी सुशांतच्या घरी जाऊन त्याच्या कुटुंबीयांची भेट घेतली आणि सांत्वन केले. त्यांनी ट्विट करून सुशांतचा फोटोही शेअर करीत श्रद्धांजली वाहिली होती. सुशांतसिंहने १४ जून रोजी मुंबईमध्ये राहत्या घरी आत्महत्या केली होती. त्याच्यावर कुटुंबियांच्या उपस्थितीत मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात आले होते. त्यानंतर त्याच्या अस्थींचे विसर्जन पाटणा येथे गंगा नदीमध्ये करण्यात आले होते. तो काही दिवस डिप्रेशनमध्ये होता, असे सांगितले जात आहे. त्याच्याशी संबंधित लोकांची चौकशी पोलीस करीत आहेत.