मुंबई - आपल्या सगळ्यांचा लाडका 'दगडू' म्हणजेच अभिनेता प्रथमेश परब आता एका नव्या अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रथमेशने आपल्या अभिनयाच्या बळावर मोठा पडदा गाजविल्यानंतर आता तो रंगभूमीवर झळकणार आहे. 'दहा बाय दहा' या विनोदी नाटकात तो महत्वपूर्ण भूमिका साकारणार आहे.
गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर 'दहा बाय दहा' हे नाटक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या नाटकाची निर्मिती स्वरुप रिक्रियेशन अॅन्ड मीडिया प्रा. लि. यांच्याअंतर्गत करण्यात येत आहे. अनिकेत पाटील हे या नाटकाचे दिग्दर्शन करत आहेत. तर, संजय जमखंडी आणि वैभव सानप यांनी या नाटकाची कथा लिहिली आहे.
'दहा बाय दहा' ही एका मध्यमवर्गीय कुटुंबाची भन्नाट गोष्ट आहे. 'दहा बाय दहा'ची चौकट तोडायला निघालेल्या या नाटकामध्ये हिंदी आणि मराठी सिनेसृष्टीतील एका नावाजलेल्या विनोदवीराचा देखील समावेश आहे. विशेष म्हणजे, तब्बल २० वर्षानंतर हे विनोदवीर मराठी रंगभूमीवर परतणार असल्यामुळे, या नाटकाची सर्वत्र चर्चा सुरु आहे.
यापूर्वी 'बालक पालक', 'टाईमपास', 'दृश्यम' अशा चित्रपटात भूमिका साकारणारा प्रथमेश आता 'दहा बाय दहा' नाटकात प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे.