मुंबई -अभिनेता प्रभास आणि श्रद्धा कपूर यांची मुख्य भूमिका असलेल्या 'साहो' चित्रपटाच्या ट्रेलरची चाहत्यांना आतुरता आहे. या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित झाल्यापासून चाहते ट्रेलरसाठी उत्सुक होते. मात्र, आता चाहत्यांना ट्रेलरची फार काळ वाट पाहावी लागणार नाही. कारण, लवकरच या चित्रपटाचा ट्रेलर चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.
तरण आदर्श यांनी 'साहो'चे एक पोस्टर शेअर करुन याबाबत माहिती दिली आहे. येत्या १० ऑगस्ट रोजी हा ट्रेलर प्रदर्शित होणार आहे.
सुरुवातीला हा चित्रपट १५ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र, अक्षय कुमारचा 'मिशन मंगल' आणि जॉन अब्राहमचा 'बाटला हाऊस' हा चित्रपट देखील याच दिवशी प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे 'साहो'च्या रिलीज डेटमध्ये बदल करुन ३० ऑगस्ट करण्यात आली आहे.
या चित्रपटात नील नितिन मुकेश, चंकी पांडे आणि जॅकी श्रॉफ यांच्याही भूमिका आहेत. आता ३० ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रदर्शित होईल. हिंदीसह तेलुगू, तमिळ आणि मल्याळम भाषेत हा चित्रपट प्रेक्षकांना पाहता येणार आहे.