मुंबई- ईशान खट्टर आणि अनन्या पांडे यांचा खाली पिली हा सिनेमा लॉकडाऊननंतर रिलीज होणारा पहिला सिनेमा ठरेल असं आम्ही कालच तुम्हाला सांगितलं होतं. मात्र आता यात एक नवीन ट्विस्ट आला आहे. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील बायोपिक असलेला ‘पीएम नरेंद्र मोदी’ हा सिनेमा पुन्हा एकदा रिलीज करण्याचा निर्णय त्याच्या निर्मात्यांनी घेतला आहे. त्यामुळे हा सिनेमाच आता १५ ऑक्टोबर रोजी देशभरात पुन्हा रिलीज होणारा पहिला सिनेमा ठरणार आहे.
‘पीएम नरेंद्र मोदी’ या सिनेमात अभिनेता विवेकानंद ओबेरॉय हा मुख्य भूमिकेत होता. या सिनेमात त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींची नऊ वेगवेगळी रूपं प्रेक्षकांसमोर आणली होती. ‘मेरी कोम’, ‘सरबजीत’ यासारखे सिनेमे दिग्दर्शित केलेल्या ओमंग कुमार याने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. आधी हा सिनेमा एप्रिल २०१९ मध्ये रिलीज होणार होता. मात्र त्याचवेळी लोकसभा निवडणुका असल्याने या सिनेमाला कोर्टात खेचून त्याची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर ती रिलीज डेट २४ मार्च २०१९ अशी जाहीर करण्यात आली. २३ मार्च २०१९ रोजी लोकसभा निवडणुकांचे निकाल लागले या निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपचं सरकार पुन्हा बहुमताने सत्तेत आलं, त्यामुळे त्याचा या सिनेमाला फायदा होईल असं वाटलं होतं. मात्र प्रत्यक्षात एवढा चांगला मुहूर्त मिळूनही या सिनेमाला म्हणावं तेवढं यश काही बॉक्स ऑफिसवर मिळालं नाही. त्यामुळेच या सिनेमाचे निर्माते सुरेश ओबॅरॉय, संदीप सिंग यांनी हा सिनेमा १५ ऑक्टोबर २०२० रोजी पुन्हा रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे.