मुंबई- ‘माझ्या आईने माझा चित्रपट ‘द गर्ल ऑन द ट्रेन’ चे पेंटिंग बनवून माझे नाव अमर केल्यासारखे वाटते आहे’ असे परिणीती चोप्रा अभिमानाने म्हणाली. त्याच झालं असं की तिची आई प्रख्यात चित्रकलाकार रीना चोप्रा हिने आपल्या लेकीच्या आगामी चित्रपटाचे, ‘द गर्ल ऑन द ट्रेन’ चे पेंटिंग बनविले असून त्याबाबत परिणीती खूपच आनंदी झाली आहे. या पेंटिंगमध्ये परिणितीच्या चित्रपटातील व्यक्तिरेखेवर वेगवान पिवळ्या ट्रेनसमोर उभी असलेली मुलगी दाखविण्यात आली आहे.
‘द गर्ल ऑन द ट्रेन’ चित्रपटाचे ‘पेंटिंग “माझ्या आईने मला या चित्रकलेने आश्चर्यचकित केले, मला माहित नव्हते की ती माझ्यासाठी असे चित्र बनवित आहे. बहुतेकांना ठाऊक आहे की माझी आई एक व्यावसायिक चित्रकार आहे आणि ती तिची कलाकृती विकत असते पण ही कलाकृती विकली जाणार नाही कारण ती माझ्यासाठी अतीव मौल्यवान आहे’, परिणिती म्हणाली. तिने पुढे सांगितले की, “तिने ‘द गर्ल ऑन द ट्रेन’ (टीजीओटीटी) मध्ये माझे काम आपल्या कलेद्वारे अमर केले आहे आणि मला तिच्याकडून मिळालेली ही सर्वात गोड, प्रेमळ आणि खास भेट आहे.” परी (परिणीतीचे शॉर्ट/टोपण नाव) पुढे म्हणाली, “तिने यापूर्वी माझ्या कोणत्याही चित्रपटासाठी असे केले नव्हते. कदाचित या चित्रपटाच्या आशयाने तिला हे पेंटिंग बनविण्यासाठी प्रेरित केले असेल. तिच्या या कृत्याने मी भारावून गेले आहे आणि त्याच वेळी मी हवेत तरंगते आहे.”परिणीतीचे आई-वडील तिचे खंदे समर्थक आहेत. तिने आपल्या नवीन घरात या पेंटिंग साठी खास जागा रिकामी करून घेतली आहे. “माझे आईवडील माझ्या आयुष्यात माझे सर्वात मोठे चीअरलीडर्स आहेत आणि मला त्यांची मुलगी होण्याचा अभिमान आहे. माझी आई माझी ‘लाईट हाऊस’ आहे जी मला आयुष्याची दिशा दाखवते. तिने केलेले हे पेंटिंग बघून मी निशब्द झाले आहे. हे टीजीओटीटीचे चित्र मला नेहमीच चांगले काम करण्याची स्फूर्ती देईल आणि माझी पुढील कामं देखील तिला नवनवीन पेंटिंग्स बनविण्यासाठी उद्युक्त करेल अशी आशा मी करतेय” असे परिणीतीने सांगितले. ‘द गर्ल ऑन द ट्रेन’ हे पॉला हॉकिन्स यांनी लिहिलेले एक प्रशंसित पुस्तक आहे. यावर २०१६ मध्ये एमिली ब्लंट मुख्य भूमिकेत असलेला हॉलिवूड चित्रपट बनला होता. बॉलिवूड आवृत्तीमध्ये परिणीती चोप्रा ही एका निनावी, मद्यपी, घटस्फोटित महिलेच्या भूमिकेत असून ती एका संशयितरित्या हरवलेल्या व्यक्तीच्या शोधात गुरफटत जाते व त्यातून अनेक सखोल रहस्ये उलगडवते. या चित्रपटाचे दिग्दर्शन रिभू दासगुप्ता यांनी केले आहे.‘द गर्ल ऑन द ट्रेन’ चा डिजिटल प्रीमियर नेटफ्लिक्सवर २६ फेब्रुवारी रोजी होणार आहे.