मुंबई -आपल्या दमदार अभिनयाने प्रसिद्धी झोतात आलेला अभिनेता म्हणजेच पंकज त्रिपाठी. नेटफ्लिक्सवरील 'सेक्रेड गेम्स' या वेबसीरिजतील भूमिकेमुळेही तो प्रचंड गाजला. या सीरिजचा दुसरा भागही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. वेबसीरिजमध्ये दाखवण्यात येणारे अलंकारिक दृष्य आणि आक्षेपार्ह्य संवादाबाबत त्याने अलिकडेच संवाद साधला. तसेच, न्यूडिटीबाबतही त्याने त्याचे स्पष्ट मत मांडले.
डिजीटल प्लॅटफॉर्मवर रिलीज होणाऱ्या बऱ्याच वेबसीरिजमध्ये आक्षेपार्ह्य संवाद आणि दृष्य दाखवली जातात. त्याच्या सेन्सॉरशिपचा प्रश्न अद्याप अनुत्तरीतच आहे. मात्र, याबाबत पंकज त्रिपाठीने आपले मत मांडले आहे. तो म्हणतो, 'मला असे वाटते की प्रत्येक कृतीमागे काही ना काही कारण दडलेलं असतं. जर त्यापैकी एकाही सीनला कात्री लावली तर तो सीन अपूर्ण वाटतो.
'चित्रपट निर्माते विक्रमादित्य मोटवाने आणि अनुराग कश्यप यांनी त्यांच्यावर असलेली जबाबदारी माहिती आहे. मात्र, जर लोकांना न्यूडिटी पाहायची असेल तर त्यांच्याकडे पॉर्नोग्राफीचा पर्याय उपलब्ध आहे. ते इंटरनेटवर ते पाहू शकतात. न्यूडिटी पाहण्यासाठी ते वेबसीरिजकडे का वळतील', असा प्रश्न त्याने उपस्थित केला.
पंकज त्रिपाठी 'सेक्रेड गेम्स २' मध्ये आध्यात्मिक गुरूच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याची पहिल्या भागातील भूमिकाही गाजली होती. त्याला अनुराग कश्यपच्याच 'गँग्स ऑफ वासेपूर' या चित्रपटातून ओळख मिळाली होती. त्यानंतर त्याने 'मसान', 'न्युटॉन', 'बरेली की बर्फी', 'लूकाछुपी', 'स्त्री' यांसारख्या चित्रपटातही भूमिका साकारल्या आहेत.
डिजीटल विश्वातही त्याने अभिनयाच्या जोरावर आपली ओळख निर्माण केली आहे. 'मिर्झापूर' या वेबसीरिजमधील त्याची 'काले भैय्या' ही भूमिका गाजली होती. आता तो 'सेक्रेड गेम्स २' मधुन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. १५ ऑगस्ट रोजी ही सीरिज प्रदर्शित होईल.