मुंबई -बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर सध्या त्याच्या आगामी 'जर्सी' चित्रपटामध्ये व्यग्र आहे. बऱ्याच दिवसांपासून या चित्रपटाचे शूटिंग सुरू आहे. दाक्षिणात्य चित्रपट 'जर्सी'चा हा अधिकृत रिमेक आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने शाहिद त्याचे वडील आणि अभिनेते पंकज कपूर यांच्यासोबत भूमिका साकारणार आहे. अलिकडेच याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.
पंकज कपूर हे शाहिदच्या प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. दिग्दर्शक गौतम तिन्नाउरी हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. मूळ चित्रपटाचे दिग्दर्शनही त्यांनी केले होते.
हेही वाचा -मंत्री गोविंद सिंग यांनी पारंपरिक पद्धतीने केले बिग बींचे स्वागत
पंकज कपूर आणि शाहिद यापूर्वी 'मौसम' चित्रपटात एकत्र झळकले होते. आता पुन्हा एकदा या चित्रपटाच्या निमित्ताने ते एकत्र आले आहेत.
शाहिदने काही महिन्यांपूर्वीच 'कबीर सिंग' चित्रपटामध्ये भूमिका साकारली आहे. हा चित्रपट देखील दाक्षिणात्य चित्रपट 'अर्जुन रेड्डी'चा रिमेक होता. 'कबीर सिंग'नंतर शाहिदची लोकप्रियता बरीच वाढली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा 'जर्सी'च्या रिमेकमध्येही त्याची वर्णी लागली आहे. आता या चित्रपटातील त्याची भूमिका पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
शाहिदसोबत अभिनेत्री मृणाल ठाकूर हिचीदेखील यामध्ये वर्णी लागली आहे. पुढच्या वर्षी २८ ऑगस्टला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा -अमिताभ बच्चन यांनी बिलासपुर येथे घेतली चाहत्यांची भेट