मुंबई - पु. ल. देशपांडे हे महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व. त्यांना सर्वजण प्रेमाने भाई म्हणत. भाईंना संगीताची विशेष आवड होती आणि समकालीन सर्वच श्रेष्ठ गायकांसोबत त्यांचे जिव्हाळ्याचे आणि मैत्रीचे संबंध होते. वसंतराव देशपांडे हे त्यातील एक नाव. निपुण अविनाश धर्माधिकारी दिग्दर्शित 'मी वसंतराव' या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. आणि त्यातील वसंतराव आणि भाईंच्या मैत्रीची सुद्धा चर्चा रंगतेय.
माझं घराणं हे माझ्यापासून सुरु होतं, हे आत्मविश्वासानं सांगणाऱ्या वसंतरावांची सांगितिक कारकीर्द यशोशिखरावर पोहोचली असली तरी त्यांचा तिथंवर पोहोचण्याचा प्रवास मात्र अतिशय खडतर होता. या संघर्षमयी प्रवासात त्यांना कायम साथ लाभली ती महाराष्ट्राच्या लाडक्या व्यक्तिमत्वाची म्हणजेच पु. ल. देशपांडे यांची. 'मी वसंतराव'च्या निमित्ताने त्यांच्या त्या काळात रंगलेल्या मैत्रीच्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा मिळाला आहे. या चित्रपटात राहुल देशपांडे, अनिता दाते, पुष्कराज चिरपुटकर, कौमुदी वालोकर आणि अमेय वाघ मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
पंडित वसंतराव देशपांडे आणि पु. ल. देशपांडे या दोघांनाही साहित्याची आवड. तिथेच या दोघांचे सूर जुळले. पंडित वसंतराव देशपांडे यांच्यातील सच्चा गायक पु. ल. देशपांडे यांनी हेरला. आवाजातील जादू ओळखून कारकुनी सोडून पूर्णवेळ गायकी सुरु करण्याचा मोलाचा सल्ला भाईनी त्यावेळी वसंतरावांना दिला. चाळीसाव्या वर्षी संगीत कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या पंडित वसंतराव देशपांडे यांना भाईंनी सुखदुःखाच्या प्रत्येक क्षणी साथ दिली. ते नेहमीच वसंतरावांच्या मागे खंबीरपणे उभे राहिले. 'आता दोन प्रकारचे लोक असतील, एक वसंता हा एकमेव गायक आहे आणि दुसरे वसंता हा गायकच नाही.'' असे स्पष्टपणे सांगणाऱ्या भाईंची वसंतरावांना मोलाची साथ लाभली.
'मी वसंतराव' या चित्रपटात पु .ल देशपांडे यांची भूमिका पुष्कराज चिरपुटकर यांनी साकारली आहे. आपल्या भूमिकेबद्दल पुष्कराज चिरपुटकर म्हणाला, ''पु. ल. देशपांडे बहुरूपी होते. लेखक, नाटककार, नट, कथाकार, पटकथाकार, दिग्दर्शक, संगीत दिग्दर्शक, साहित्यिक अशा नानाविविध छटांमध्ये त्यांचं व्यक्तिमत्व सामावलेलं होतं. साहित्यकलेचे गुण जणू त्यांना जन्मजातच मिळालेले आणि पंडित वसंतराव यांना आईकडून गायकीचा वारसा लाभलेला. मी खूप नशीबवान आहे की अशा महान व्यक्तिमत्वाची भूमिका साकारण्याची मला संधी मिळाली.”