मुंबई - बॉलिवूडची 'देसी गर्ल' प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन गायक निक जोनास हे गतवर्षी लग्नबंधनात अडकले. जोधपूरच्या उमेद भवनमध्ये त्यांचा शाही विवाहसोहळा पार पडला होता. सोशल मीडियावरही दोघे नेहमी सक्रिय असतात. त्यांच्या लग्नानंतर त्यांचे बरेचसे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आता चर्चा रंगली आहे ती म्हणजे प्रियांका लवकरच आई होणार असल्याची. होय, प्रियांकाच्या काही फोटोंमुळे ती प्रेग्नंट असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत.
प्रियांका आणि निकने अलिकडेच 'मेट गाला' आणि 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मध्ये चाहत्यांचे लक्ष वेधले. मात्र, यावेळी तिचा लूक पाहून सोशल मीडियावर वेगळीच चर्चा रंगल्याचे पाहायला मिळाले. या चर्चांना हवा देण्याचे काम तिच्या कान्समधील लूकने केले. प्रियांकाने जो ड्रेस घातला होता त्यामध्ये तिचे 'बेबी बम्प' समोर आल्याचे दिसले. यावरून ती प्रेग्नंट आहे का? असे प्रश्न सोशल मीडियावर विचारले जाऊ लागले. यातच ऑस्कर विजेती ओक्टाव्हिया स्पेन्सर हिच्या एका कमेंटने तर या चर्चा अधिकच रंगल्या आहेत.