महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

‘झोंबिवली’ सिनेमाच्या टायटलवर मूळच्या ‘डोंबिवली’करांचा आक्षेप! - डोंबिवली’करांचा आक्षेप

दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांच्या नव्या ‘झोंबिवली’ या सिनेमाचं पहिलं वहिलं पोस्टर काल सोशल मीडियावर लाँच झालं. सिनेमाचं नाव आणि त्याचं नामसाधर्म्य ‘डोंबिवली’ या शहराशी जुळत असल्याने पोस्टर पाहणाऱ्या प्रत्येकाची त्यावर प्रतिक्रिया उमटणं सहाजिकच होतं. मात्र पोस्टर प्रदर्शित होऊन २४ तास उलटत नाहीत तोच डोंबिवली शहरातील मूळच्या आणि सच्चा डोंबिवलीकरांनी या सिनेमाच्या नावावर आक्षेप घेतला आहे.

zombivali-movie
‘झोंबिवली

By

Published : Jul 31, 2020, 6:56 PM IST

‘उलाढाल’, ‘क्लासमेट्स’, ‘फास्टर फेणे’ यासारख्या यशस्वी सिनेमांचे दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांच्या नव्या ‘झोंबिवली’ या सिनेमाचं पहिलं वहिलं पोस्टर काल सोशल मीडियावर लाँच झालं. सिनेमाचं नाव आणि त्याचं नामसाधर्म्य ‘डोंबिवली’ या शहराशी जुळत असल्याने पोस्टर पाहणाऱ्या प्रत्येकाची त्यावर प्रतिक्रिया उमटणं सहाजिकच होतं. मात्र पोस्टर प्रदर्शित होऊन २४ तास उलटत नाहीत तोच डोंबिवली शहरातील मूळच्या आणि सच्चा डोंबिवलीकरांनी या सिनेमाच्या नावावर आक्षेप घेतला आहे.

‘झोंबिवली’ सिनेमाच्या टायटलवर मूळच्या ‘डोंबिवली’करांचा आक्षेप

याबाबत काही नेटीझन्सनी डोंबिवली शहराला स्वतःचा असा एक अभिमान असून कलेच्या नावावर शहराच्या नावाचा केलेला अपभ्रंश सहन करणार नाही अशा शब्दात आपल्या भावना सोशल मीडियावर व्यक्त केल्या.

तर अशाच काही पोस्टची दखल घेऊन मनसेचे स्थानिक नेते राजेश कदम यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून याबाबत पोस्ट लिहून आपली भावना व्यक्त केली आहे, त्यात त्यांनी लिहिलं आहे की,‘माझ्या डोंबिवलीचे कोणी ही यावे आणि वाभाडे काढावे हे मी तरी खपवून घेणार नाही, माझ्या शहराचा अपमान हा माझा अपमान असं मी समजतो...आहेत आमच्या शहरात नागरी समस्या, त्या तर सर्वच ठिकाणी आहेत, आम्ही आमच्यात बघून घेवू, आमच्या डोंबिवलीच्या संस्कृतीचे जगाने अनुकरण केले, कुठलेही क्षेत्र नाही किंवा जगाच्या पाठीवर असा कुठलाही कोपरा नाही जिथे माझा डोंबिवलीकर भेटणार नाही, सुशिक्षित, सुसंस्कृतांची ही पंढरी आहे, डोंबिवली हे कलेचे, कलाकारांचे माहेर घर आहे. अशा या माझ्या शहराची बदनामी करू नका, माझ्या शहराला कोणी काही चांगले देवू शकत नसेल तर त्याबद्दल वाईट तरी पसरवू नका...चांगली किंवा वाईट मांडणी केलेला सिनेमा आहे हे आत्ता सांगतां येणार नाही. परंतु हा जाहिरात फोटो व्हायरल झाल्या पासून माझ्या शहराबद्दल नको ते विचार मांडले जात आहेत, भविष्यात माझ्या शहराकडे संशयाने पाहिले जाईल, त्याचा त्रास माझ्या भावी व तरूण पीढीला होईल, व डोंबिवलीकर म्हणून सतत अपमानास्पद वागणूक मिळेल त्याची खबरदारी म्हणून ही पोस्ट मी एक डोंबिवलीकर म्हणून करत आहे.’

‘झोंबिवली पोस्टर प्रदर्शित

सिनेमाच्या नावाला सुरू झालेला विरोध पाहता काही सिनेसमीक्षकांनी याबाबत आपली भूमिका मांडली. पत्रकार अमोल परचुरे यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर याबाबत स्पष्टीकरण देताना असं लिहिलं आहे की, ‘कोणतीही कलाकृती न बघता, त्यात नेमकं काय दाखवलंय याची माहिती न घेता... केवळ नावावरुन आक्षेप घेणं हे दुर्दैवी आहे. सध्या केवळ सिनेमाची घोषणा झालेली आहे, अजून शूटिंगला सुरुवात झालेली नाही. पोस्टरवरुन एवढं लक्षात येतंय की हॉलिवूडमध्ये गाजलेल्या ‘झॉम्बी’ या प्रकारातला हा सिनेमा आहे. यापूर्वी हिंदीत ‘गो गोवा गॉन’ हा या प्रकारातला सिनेमा येऊन गेलाय, तेव्हा गोवेकरांनी त्यावर आक्षेप घेतला नाही. डोंबिवली शहरावर ‘झॉम्बी’ आक्रमण करतात म्हणून त्याचं नाव ‘झोंबीवली’ ठेवलेलं असणार. मुंबईत जेव्हा पाणी तुंबतं तेव्हा हल्ली सर्रास ‘तुंबई’ असं म्हणतात, त्यातलाच हा प्रकार. ‘दिल्ली का ठग’ सारखे सिनेमे येतात तेव्हा असा नावावरुन विरोध झालेला ऐकिवात नाही. यात डोंबिवलीची कुठे बदनामी असेल असं वाटत नाही, उलट डोंबिवलीकर या ‘झॉम्बी’ संकटाला कसे परतवून लावतात हे फिल्मी पद्धतीने दाखवणार असा अंदाज येतोय. मराठीत पहिल्यांदाच येणाऱ्या ‘झॉम्बी’ सिनेमासाठी डोंबिवलीची निवड होणं यात गैर काही आहे असं वाटतच नाही. असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.

‘झोंबिवली’ सिनेमाच्या शूटिंगचा श्रीगणेशा नावावरून वाद सुरू झाला असतानाच, आज मुंबईत ‘झोंबिवली’ या सिनेमाच्या प्रत्यक्ष शूटिंगला आजपासून सुरूवात झालेली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व उपाययोजना करून या सिनेमाचं शूटिंग सुरू होत असल्याची पोस्ट सिनेमाचा दिग्दर्शक आदित्य सरपोतदार याने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून टाकली आहे. सिनेमात ललीत प्रभाकर, वैदेही परशुरामी आणि अमेय वाघ यांच्या या सिनेमात मुख्य भूमिका आहेत. त्यामुळे आता नवावरून सुरू झालेला हा वाद इथेच संपतो का झोंबींच्या आधी निर्माता दिग्दर्शकांना डोंबिवलीकरांचा रोष थंड करावा लागतो ते पहायचं.

ABOUT THE AUTHOR

...view details