रायगड : श्रीमंत दामोदर पंत या नाटकात 'शृंगारपुरे' ही भूमिका अजरामर करणारे अभिनेते जयराज नायर यांनी शंभरहून अधिक मराठी, हिंदी सिनेमा, नाटकात भूमिका केल्या आहेत. शाहीर साबळे यांच्या कंपनीत दहा बारा वर्षे काम केल्यानंतर ते मराठी सिनेसृष्टीत स्थिरावले. अलिबाग येथे जुगाड्या सिनेमाच्या शूटिंगसाठी आले असता जयराज नायर यांच्याशी केलेली बातचीत -
कोरोनामुळे आठ महिने घरात बसून
कोरोना महामारी सुरू झाली आणि आम्हा कलाकारांना तसेच पडद्यामागील कर्मचाऱ्यांना फटका बसला. मी गेले आठ महिने घरात बसून होतो. ऑक्टोबर महिन्यात सात महिन्यानंतर पहिल्या सिनेमाच्या शूटिंगसाठी अमरावती येथे गेलो. यावेळी मनात भीती होतीच; तरीही काम करणे गरजेचे होते. शूटिंग काळात हात धुणे, गरम पाणी पिणे, मास्क लावणे, सुरक्षित अंतर ठेवून काम करीत होतो. आता हा अलिबागमध्ये दुसरा जुगाड्या या सिनेमाची शूटिंग करीत आहे, असे जयराज नायर म्हणाले.
अलिबागेत माशावर मारला ताव
अलिबागमध्ये जुगाड्या सिनेमाची शूटिंग सुरू आहे. अलिबाग माझे आवडीचे ठिकाण आहे. विशेष म्हणजे, समुद्रातील ताजे मासे खाण्यास मिळाले. त्यामुळे माशांवर ताव मारण्यास मिळाला, असे नायर यांनी सांगितले.
हेही वाचा - तलावाच्या रेड आउटफिटमध्ये पोज देतानाचा सोनाक्षी सिन्हाचा फोटो व्हायरल
नाटकातल्या कामाची दाद मिळते त्वरित
सिनेमा आणि नाटक हे वेगवेगळे समीकरण आहे. सिनेमामध्ये एखादा संवाद उत्तम असला तरी, त्याला दाद लगेच मिळत नाही. सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर त्या संवादाला टाळ्या पडतात. यात बराच वेळ जातो. मात्र नाटक हे जिवंत असते. समोर प्रेक्षकवर्ग बसलेला असतो. अभिनेत्यांनी फेकलेला संवाद आवडल्यास प्रेक्षक हे त्वरितटाळ्या, शिट्या मारून दाद देतात. त्यामुळे नाटकात काम करताना आपल्या कामाचे कौतुक त्वरित अनुभवण्यास मिळते, अशी प्रतिक्रिया अभिनेते जयराज नायर यांनी दिली.
... अन् वकिलांनी घेतला तोंडाचा वास
सही रे सही नाटकात जयराज नायर यानी दारुबाज दत्तूची भूमिका केली आहे. या भूमिकेबाबत नायर यांनी सांगितलेला किस्सा. सांगली येथे सही रे सही नाटकाचा शो होता. या नाटकाच्या शोला काही वकील मंडळीही आली होती. त्यांच्यात पैज लागली की, जयराज नायर हे मद्य पिऊन भूमिका करीत आहेत. नाटक संपल्यानंतर सर्व वकील भेटण्यास आले. त्यावेळी काही जण माझ्या एकदम तोंडाजवळ येऊन वास घेऊ लागले. तेव्हा मी ओरडलो. वकिलांनी सांगितले आम्हाला वाटलं, तुम्ही मद्य पिऊन अभिनय करीत आहात. मी भूमिका करताना कधीच मद्यप्राशन करीत नाही, असे सांगितले. मात्र हीच प्रेक्षकांची पावती आपल्या अभिनयाला मिळते हे भाग्यच आहे, असे नायर यांनी म्हटले आहे.
वेब सीरिजचा प्रभाव आहे, पण..
कोरोना काळात वेब सीरिजचा वाढता प्रभाव आहे. प्रेक्षक मोबाईलमध्ये घरी बसून नवीन नवीन वेबसीरिज, सिनेमाचा आनंद घेत आहेत. मी सुद्धा वेब सीरिज पाहतो. मात्र असे असले तरी पडद्यावर सिनेमा पाहण्याची मजा काहीं वेगळीच असते. त्यामुळे पुन्हा एकदा प्रेक्षक हा मोठ्या पडद्याकडे वळेल, असे मत जयराज नायर यांनी व्यक्त केले आहे.
हेही वाचा - मी प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन काम केले - आयुष्यमान खुराणा
तरुण अभिनेत्यांनी वेळेचे भान ठेवणे गरजेचे
सिनेमा, नाटकात तरुणाई पदार्पण करीत आहे. याबाबत आपले काय मत आहे, असे नायर यांना विचारले असता, तरुण अभिनेते हे शूटिंग ठिकाणी वेळेत येत नाहीत. त्यांनी वेळेचे नियोजन करणे महत्वाचे आहे. निर्माता हा शूटिंगच्या वेळी खर्च करीत असतो. वेळेवर सर्व झाले तर, त्यांनाही त्याचा लाभ मिळतो. आपल्या मराठी निर्मात्यांना आपणच सांभाळून घेणे महत्वाचे आहे. त्यामुळे वेळेचे महत्व तरुण अभिनेत्यांनी पाळणे महत्वाचे आहे.