चित्रपट, चित्रीकरण याबद्दल सामान्य माणसाला नेहमीच आकर्षण राहिले आहे. यामुळेच एखाद्या चित्रपटाचे चित्रीकरण आपल्या परिसरात सुरु आहे असे समजले की, त्या स्थळी मोठी गर्दी जमते. आपल्या आवडीच्या कलाकाराची एक झलक पाहण्यासाठी चाहते तासन् तास ताटकळत बसतात, असे चित्र अनेकदा दिसते. मात्र तुम्हाला चक्क एखाद्या सेटवर जाऊन फेरफटका मारत कलाकारांशी मनमोकळ्या गप्पा मारता आल्या तर?... हाच अनुभव वृत्तपत्र विक्रेते आणि त्यांच्या मुलांना आगामी ‘सरसेनापती हंबीरराव’ या भव्य ऐतिहासिक मराठी चित्रपटाच्या सेटवर आला.
वृत्तपत्र विक्रेते आणि त्यांच्या मुलांची ‘सरसेनापती हंबीरराव’च्या चित्रीकरणाला भेट - News paper sealer visit Sarsenapati Hambirrao film set
वृत्तपत्र विक्रेते आणि त्यांच्या मुलांना आगामी ‘सरसेनापती हंबीरराव’ या भव्य ऐतिहासिक मराठी चित्रपटाच्या सेटवर चित्रपट निर्मितीचा अनुभव आला. यावेळी लेखक, दिग्दर्शक प्रविण विठ्ठल तरडे यांचा बच्चे कंपनीशी दिलखुलास संवाद झाला.
![वृत्तपत्र विक्रेते आणि त्यांच्या मुलांची ‘सरसेनापती हंबीरराव’च्या चित्रीकरणाला भेट Sarsenapati Hambirrao film set](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-5908913-thumbnail-3x2-oo.jpg)
अभिनेते प्रविण विठ्ठल तरडे ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक आहेत. भोर येथील राजवाड्यात सध्या या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु आहे. याच ठिकाणी भेट देत पुण्यातील वृत्तपत्र विक्रेते आणि त्यांच्या मुलांनी चित्रीकरण कसे चालते हे बघितले. त्यानंतर प्रविण तरडे आणि चित्रपटातील कलाकार, तंत्रज्ञ यांच्याशी गप्पा मारल्या. यावेळी वृत्तपत्र विक्रेते आणि बच्चे कंपनीशी दिलखुलास संवाद साधत तरडे यांनी त्यांच्या शंकांचे निरसन केले. याप्रसंगी पुणे वृत्तपत्र विक्रेता संघाचे अध्यक्ष विजय पारगे, वरिष्ठ उपाध्यक्ष दत्तात्रय पिसे, यतीन चौधरी, अतुल पारगे, महादेव नेमाने, दिपक निंगुणे, यशवंत वादवणे, अमित जाधव, केदार मारणे, मंगेश नवघणे, विजय वळे, अनिल तागुंदे, श्रीकांत मोरे, उमेश पिसे आदी वृत्तपत्र विक्रेते उपस्थित होते.
‘‘आम्ही घरोघरी जे वृतपत्र टाकतो त्यामध्ये चित्रपट विषयक बातम्या, लेख, परीक्षण वाचायला मिळते. यामुळे प्रेक्षकांपर्यंत चित्रपटांची माहिती पोहोचविण्याचे आम्ही एक प्रभावी माध्यम आहोत. मात्र आम्ही कधी पडद्यामागे चित्रपट कसा निर्माण होते हे बघितले नव्हते. आज ‘सरसेनापती हंबीरराव’च्या सेटवर ते सर्व अनुभवता आले, आमच्या मुलांच्या प्रश्नांना तरडे यांनी दिलेली उत्तरे, ऐतिहासिक चित्रपटाच्या चित्रीकरणाचा अनुभव या सर्व गोष्टी म्हणजे आमच्यासाठी अविस्मरणीय क्षण आहेत’.’’ अशी भावना वृत्तपत्र विक्रेत्यांनी यावेळी व्यक्त केली.