निर्मात्या अमृता अरुण राव यांनी 'मानिनी', 'वादळवारं सुटलं', 'हंबरडा', 'आरोही, गोष्ट तिघांची” तसेच प्रदर्शनासाठी प्रलंबित असलेले “हा मी मराठी” आणि “साप शिडी” असे एका पेक्षा एक आशयघन चित्रपट बनवले आहेत. चित्रपट, नाटक, मालिका,आणि वेब सिरीज या माध्यमांचा वापर समाज घडवण्यासाठी करता येऊ शकतो असं मानत काम करणाऱ्या फिल्ममेकर्सपैकी त्या एक आहेत. त्यांच्या “अमृता फिल्म्स” या निर्मिती संस्थेनं २००२ मध्ये 'मानिनी' या चित्रपटाद्वारे मनोरंजन विश्वात प्रवेश केला. आता 'श्यामची आई' या चित्रपटाच्या रूपात त्यांनी एक नवं आव्हान स्वीकारलं आहे. हरहुन्नरी तरुण दिग्दर्शक सुजय डहाकेच्या दिग्दर्शन शैलीतून प्रेक्षकांना ब्लॅक अँड व्हाईटमध्ये 'श्यामच्या आई'चं दर्शन घडणार आहे.
सुजयनं 'श्यामची आई' हा चित्रपट बनवण्याचा प्रस्ताव ठेवला आणि तो आवडल्यानं लगेच होकार दिल्याचं सांगत अमृता म्हणाल्या की, “आज क्राईम, सेक्स आणि व्हायलन्सचा बोलबाला आहे, यातून नवीन पिढीवर काय संस्कार होणार? आजची लहान मुलं ही उद्याची तरुण पिढी आहे. स्वत:चं करियर करताना बहुतांशी पालकांचं मुलांकडे दुर्लक्ष होत आहे. नव्या पिढीवर संस्कार करण्यासाठी 'श्यामची आई' या सारख्या चित्रपटांची गरज आहे.”
२४ वर्षे दूरदर्शनवर बातम्या देणाऱ्या अमृता एम. एससी., एलएलबी आहेत. कानडी भाषेतून शालेय शिक्षण झालेल्या अमृता सातवीत असताना मुंबईत आल्यावर मराठीशी संबंध आला. विज्ञान शाखेचा अभ्यास करीत असल्यामुळे त्यांचा साहित्याशी फार संबंध आला नव्हता. दूरदर्शनसाठी सिलेक्शन झाल्यानंतर मराठीचा अभ्यास सुरू केल्यावर 'श्यामची आई' हे पुस्तक त्यांच्या वाचनात आलं आणि त्यांनी चित्रपटही पाहिला. वृत्त निवेदिका म्हणुन दूरदर्शनवर काम करतानाच त्या ३-४ वर्ष कायद्याची प्रॅक्टिस करत होत्या. काही पुरस्कार सोहळ्यांमध्ये परीक्षक म्हणूनही काम केलं असल्यानं उत्तम कलाकृतींची जाण आहे. चित्रपट निर्मितीसोबत अमृता या चार केमिकल कंपन्यांमधे डायरेक्टर या पदावर कार्यरत आहेत.