मुंबई - 'लाईट दिस लोकेशन' या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये फायकस प्रोडक्शन्स प्रस्तुत 'नेट प्रॅक्टिस' या लघुपटाने बाजी मारली आहे. संपूर्ण आशियातून हा लघुपट रनरअप ठरला आहे. तर, भारतातून या महोत्सवात अव्वल ठरणारा हा पहिलाच लघुपट आहे. हा महोत्सव युएसमध्ये पार पडतो. यामध्ये जगभरातून जवळपास १२-१३ लघुपटांची निवड झाली होती. त्यात आशियाई देशातून चीन पहिला आणि भारताच्या 'नेट प्रॅक्टिस' हा लघुपट रनर अप ठरला आहे.
'नेट प्रॅक्टिस' या लघुपटाची कथा एका तरूणाभोवती आधारीत आहे. जो काही दिवसानंतर लग्नबेडीत अडकणार आहे. लग्नाआधी गर्लफ्रेंड किंवा रिलेशनशीपमध्ये तो नव्हता. त्यामुळे त्याचे मित्र त्याला लग्नाच्या आधी पत्नीसोबत संबंध ठेवण्याआधी एकदा त्याचा अनुभव घेऊन बघ, असे सांगतात. यावर तो तयारही होतो. त्यानंतर त्याला कोणकोणत्या अनुभवाला सामोरे जावे लागते, हे लघुपटात दाखवण्यात आले आहे.
लेखक आणि दिग्दर्शक सचिन कदम खूप खूश असून त्याने या लघुपट रनर अप ठरल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. या यशामुळे मी खूप खूश आहे. याचं संपूर्ण श्रेय टीमला जातं. माझ्यामागे खूप मोठे पाठबळ नव्हते. पण, या महोत्सवात सहभागी होण्यासाठी टीममधील सर्व सदस्यांनी खूप सहकार्य केलं. असे त्याने आवर्जून सांगितले आहे.