मुंबई -नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोने (एनसीबी) पुन्हा एकदा अभिनेत्री दीपिका पदुकोणची माजी मॅनेजर करिश्मा प्रकाश हिला समन्स बजावले आहे. एनसीबीने करिश्मा हिला मंगळवारी एनसीबी कार्यालयात हजर राहण्यास सांगितले आहे.
शनिवारी मुंबईतील विशेष कोर्टाने करिश्मा प्रकाशच्या अग्रिम जामीन अर्जावरील सुनावणी १० नोव्हेंबरपर्यंत तहकूब केली होती. चौकशीत सहकार्य करण्याच्या अटीवर विशेष कोर्टाने तिला या प्रकरणात दिलेली अंतरिम सवलत वाढविली होती.
एनसीबीने यापूर्वीही ड्रगच्या प्रकरणात तिची चौकशी केली होती. अटक टाळण्यासाठी तिने कोर्टात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. एनसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय एजन्सीने गेल्या महिन्यात तिच्या घराचा शोध घेतला असता १.७ ग्रॅम हशिश ताब्यात घेतल्यामुळे करिश्मा प्रकाशला पुन्हा समन्स बजावण्यात आले आहे.
जूनमध्ये अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर अंमली पदार्थ आणि बॉलिवूड सेलिब्रिटींमधील कथित संबंधांबद्दल चौकशी करण्यासाठी एनसीबीने २८ ऑक्टोबरला करिश्मा प्रकाश हिला बोलावले होते. ड्रग्ज प्रकरणात एनसीबीसमोर दीपिका, अभिनेत्री सारा अली खान आणि श्रद्धा कपूर यांनी यापूर्वीच त्यांचे जबाब नोंदवले आहेत.