मुजफ्फरनगर (उत्तर प्रदेश) - बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी आणि त्याच्या कुटुंबीयांना प्रयागराज उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. उच्च न्यायालयाने नवाजुद्दीनसह त्याच्या कुटुंबीयांच्या अटकेला स्थगिती दिली आहे.
नवाजुद्दीनची पत्नी आलिया सिद्दीकी उर्फ अंजली पांडे हिने २७ जुलै २०२० ला मुंबईच्या वर्सोवा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. तिला आणि तिच्या लहान मुलीला नवाजुद्दीनने २०१२ मध्ये बुढाना येथील आपल्या घरात सोडले, असे अलियाने आपल्या तक्रारीत सांगितले. याच बरोबर यात आलियाने मुलीसोबत अत्याचार झाल्याचेही आरोप पत्रात म्हटलं आहे.
आलियाने या प्रकरणी, नवाजुद्दीन याच्यासह तिची सासू मेहरून्निसा, नवाजचा भाऊ फयाजुद्दीन, अयायुद्दीन आणि मिनाजुद्दीन यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. यानंतर १६ ऑक्टोबरला पोलिसांनी आलिया सिद्दीकी हिने दिलेला जबाब पॉस्को न्यायालयात घेतला होता. आता या प्रकरणात नवाजुद्दीन आणि त्यांच्या कुटुंबीयातील सदस्यांना दिलासा मिळाला आहे. प्रयागराज उच्च न्यायालयाने या सर्वांच्या अटकेला स्थगिती दिली आहे.