मुंबई - बॉलिवूडमध्ये फक्त आपल्या अभिनयाने यशाचे शिखर चढणाऱ्यांमध्ये अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीचे नाव अग्रस्थानी आहे. दमदार अभिनय, सहजसुंदर शैली आणि साधेपणा हे सर्व गुण अंगी असतानाही नवाजुद्दीनला यशासाठी तब्बल १२ वर्षे प्रतीक्षा करावी लागली. तरीही हार न मानता त्याने प्रयत्न सुरू ठेवले. शेवटी त्याचे प्रयत्न फळाला लागले. आज तो आघाडीच्या बॉलिवूड कलाकारांच्या रांगेत जाऊन बसला आहे. आज त्याचा ४५ वा वाढदिवस आहे. जाणून घेऊयात त्याच्याबद्दल या खास गोष्टी...
उत्तर प्रदेशच्या मुजफ्फरनगरमधील बुढाना गावात नवाजुद्दीनचा जन्म झाला. त्याचे वडील शेतकरी होते. लहानपणी चित्रपट बघण्यासाठी नवाजुद्दीन पैसे जमा करून दिवाळी किंवा ईदच्या दिवशी शहरात चित्रपट पाहायला जात असे.
एका माध्यमाच्या मुलाखतीत नवाजुद्दीनने त्याच्या स्ट्रगलींगबद्दल बोलताना अनेक गोष्टींचा उलगडा केला होता. त्याच्या आयुष्यात असाही एक काळ होता, ज्यावेळी त्याच्याकडे एकवेळच्या जेवणाचेही पैसे नसायचे. २००० मध्ये त्याने मुंबई गाठली होती. मुंबईत आल्यानंतर त्याला अनेकदा हार मानून घरी जावेसे वाटायचे. मात्र, गावात गेल्यावर सर्व खिल्ली उडवतील या विचाराने तो स्ट्रगल करत राहिला. तब्बल ५ वर्षे तो मुंबईत स्ट्रगल करत होता. त्याला टीव्ही मालिकांमध्येही काम मिळत नव्हते. सर्वांना 'हिरो'चा चेहरा हवा होता. मात्र, नवाजुद्दीनकडे फक्त अभिनय कौशल्य होते.
नवाजुद्दीनने 'सरफरोश' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. यामध्ये त्याची छोटी भूमिका होती. त्यानंतर त्याला दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी ब्लॅक फ्रायडे' चित्रपटात पहिली भूमिका साकारण्याची संधी दिली. या चित्रपटानंतर त्याने 'फिराक', 'न्युयॉर्क' आणि 'देव डी' यांसारखे चित्रपट साकारले. सुजॉय घोष यांच्या 'कहानी'मध्येही त्याने भूमिका साकारली. मात्र, यापैकी त्याला कोणत्याच चित्रपटातून पाहिजे तशी ओळख मिळाली नाही.