कोल्हापूर जिल्ह्यातल्या आजरा येथे राष्ट्रीय पुरस्कार विजेते सैराटकार नागराज मंजुळे यांना लोकशाहीर द. ना. गव्हाणकर स्मृती पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. निर्भीड पत्रकार संजय आवटे यांच्या हस्ते हा पुरस्कार नागराज यांना देण्यात आला. यावेळी आजरा पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते.
नागराज मंजुळे यांचा लोकशाहीर द. ना. गव्हाणकर स्मृती पुरस्कारने सन्मान
लोकशाहीर द. ना. गव्हाणकर यांच्या नावाने दिला जाणारा दुसरा स्मृती पुरस्कार सृजनशील दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना बहाल करण्यात आला.
लोकशाहिरांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गेल्या वर्षीपासून आजरेकर जनतेने हा पुरस्कार सुरू केलाय. गेल्या वर्षी ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळूंखे यांना देण्यात आला. ४५ वर्षांहून अधिक काळ शोषित वर्गाच्या मुक्तीचा ध्यास घेऊन द. ना. गव्हाणकर या महान कलावंताने आपली कला लोककल्याणासाठी वाहिली. त्यांची लेखणी आणि वाणी सतत लोकलढ्याचा आवाज बनून राहिली. म्हणूनच तर त्यांना लोकशाहीर म्हणून गौरवलं गेलं. लोकशाहिरांच्या नावाने दिला जाणाऱ्या या पुरस्कारामुळे माझी जबाबदारी आणखीनच वाढली असल्याचे नागराज मंजुळे यांनी सांगितले.
पत्रकार संजय आवटे यांनी आपल्या धारदार शैलीत आजच्या वर्तमानकालीन व्यवस्थेचा धांडोळा घेतला. माध्यमांची जबाबदारी वाढली असताना माध्यमे जे करत नाहीत ते काम आजऱ्यासारख्या छोट्या गावात इथली चळवळ करते हे महत्त्वाचं आहे. सामान्य माणसांचा आवाज दाबला जात असतांनाच्या काळात श्रमिक कष्टकर्यांसाठी आयुष्य देणाऱ्या गव्हाणकारांचं स्मरण केलं जातं, आणि माझ्यासारख्या परखड पत्रकारांना बोलावलं जातं हे धाडसाचं काम आहे. आजरेकर ते करताहेत हे कौतुकास्पद आहे. कार्यक्रमाची सुरुवात सिनेनाट्य कलावंत संभाजी तांगडे यांनी सादर केलेल्या लोकशाहीचा पोवाड्याने झाली.