मुंबई - संगीतकार अशोक पत्की यांनी आजवर बऱ्याच अवीट गोडीची, सुमधूर चालीच्या गाण्यांची निर्मिती केली आहे. आता त्यांनी दिग्दर्शक समीर आठल्ये दिग्दर्शित 'बकाल' चित्रपटासाठी नवा संगीत प्रयोग केला आहे. अलिकडेच या चित्रपटाचा संगीत प्रकाशन सोहळा मुंबईत पार पडला.
'बकाल' हा एक अॅक्शनपट आहे. या चित्रपटासाठी अशोक पत्की यांनी पाश्चिमात्य शैलीतील गाणी तयार केली आहे. त्यांच्या या प्रयोगाचं संगीतविश्वात कौतुक होत आहे.
हा चित्रपट तरुणाईशी निगडीत असल्याने आधुनिक पद्धतीचे पाश्चिमात्य शैलीचे संगीत निर्माण करावे लागेल, असे समीर आठल्ये यांनी अशोक पत्कींना सांगितले होते. याबाबत संगीत प्रकाशन सोहळ्यात अशोक पत्की यांनी अनेक गोष्टींचा उलगडा केला.
हेही वाचा -'सरदार उधम सिंग'च्या शूटिंगदरम्यान विकी कौशलची सुवर्णमंदिराला भेट
''मी नेहमी प्रमाणे हार्मोनियमवर गीतकार मंदार चोळकर यांच्या गीतरचनांना चाली लावल्या आणि संगीत संयोजक मणी यांना ऐकवल्या. पण, मणी यांच्याही हे संगीत आवाक्याबाहेरचे होते. म्हणून मणी यांचे चिरंजीव सनी यांनी नव्या दमाच्या डीजे स्टाईल संगीत संयोजकाकडून काम करून घेतले'.
'माझ्या या नव्या प्रयोगावर ज्या पद्धतीने संगीत संयोजन झाले ते पाहून समीर आठल्ये सकट साशंक असलेली चित्रपटाची संपूर्ण टीम अवाक झाली. इतकेच नव्हे तर मी कधी नव्हे ते पहिल्यांदा स्वत:ची चौकट मोडून एक आयटम साँग रचले आहे. या अश्या बाजाची गाणी मी कधीच रचली नव्हती. त्यामुळे ही गाणी करताना तणाव आला होता. परंतु, दिग्दर्शक समीर आठल्ये आणि निर्माता राजकुमार मेन्डा यांनी ठेवलेला विश्वास मी सार्थ ठरवला. याचे मला समाधान आहे', असेही ते म्हणाले.