मुंबई -बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना नुकताच नामांकित दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या घोषणेनंतर अनेकांनी बिग बींवर शुभेच्छांचा वर्षाव केला. मुंबई पोलिसांनीही बिग बींचं खास अंदाजात अभिनंदन केलं आहे. सोशल मीडियावर मुंबई पोलिसांचं ट्विट व्हायरल झालं आहे.
अमिताभ बच्चन यांच्या 'जंजीर' चित्रपटातील एक फोटो शेअर करुन मुंबई पोलिसांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. या चित्रपटात अमिताभ यांनी 'इन्स्पेक्टर विजय' ही भूमिका साकारली होती. 'सर्वात सदाबहार, प्रेरणादायक व्यक्तिमत्व असलेल्या अमिताभ बच्चन यांना आम्ही वंदन करतो', असे ट्विट त्यांनी केलं आहे.
यंदाच्या दादासाहेब फाळके पुरस्कारासाठी अमिताभ बच्चन यांची निवड करण्यात आली आहे. त्यांना आजवर बरेच पुरस्कार मिळाले आहेत. अग्निपथ, ब्लॅक, पा आणि पिकू यांसारख्या चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कारही मिळाले आहेत. २०१५ साली त्यांनी देशाचा दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार 'पद्म विभूषण' या पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे.