मुंबई -स्त्री समाजात कोणत्याही क्षेत्रात वावरली तरीही पुरुषप्रधान संस्कृतीत ती एकटीच असते. अशा आशयाभोवती फिरणाऱ्या एका सत्य घटनेवर आधारित 'बंदीशाळा' हा सिनेमा येत्या २१ जूनला प्रदर्शित होतोय. या सिनेमात अभिनेत्री मुक्ता बर्वे ही माधवी सावंत या एका कर्तव्यदक्ष महिला तुरुंग पोलीस अधीक्षकाच्या भूमिकेत आपल्याला दिसणार आहे.
जोगवा, पांगीरा, दशक्रिया यासारख्या सिनेमाचे लेखक संजय कृष्णाजी पाटील यांनीच या सिनेमाची कथा लिहिली आहे. तर, यावर्षी शासनातर्फे 'कान फिल्म फेस्टिव्हल'ला पाठवण्यात आलेल्या सिनेमांमध्ये 'बंदीशाळा' या सिनेमाचा समावेश आहे. याशिवाय नुकत्याच पार पडलेल्या ५६ व्या राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यात या सिनेमाला तब्बल ७ पुरस्कार मिळाले आहेत. त्यामुळे सिनेमाची उत्सुकता प्रदर्शनाआधीच वाढली आहे.
मिलींद लेले यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केले असून, सुरेश देशमाने यांनी या सिनेमाचं चित्रीकरण केलं आहे. मुक्ताशिवाय या सिनेमात विक्रम गायकवाड, अजय पुरकर, आनंद अलकुंटे, शरद पोंक्षे, सुनील जगताप आणि हेमांगी कवी यांच्याही महत्वाच्या भूमिका आहेत. या सगळ्यांनी या सिनेमाला एक नवी उंची मिळवून देण्यात महत्वाचा वाटा उचललेला आहे.
अमितराज यांनी या सिनेमाला संगीत दिलं असून वैशाली सामंत, प्रियांका बर्वे यांनी या सिनेमातली गाणी गायली आहेत. विशेष म्हणजे प्रियंकाला या सिनेमासाठीच तिच्या कारकिर्दीतील पहिला राज्य शासनाचा सर्वोत्कृष्ट गायिकेचा पुरस्कार मिळाला आहे.
राजकारणी, गुन्हेगार, वरीष्ठ पोलीस अधिकारी, आणि समाज या सगळ्यांशी दोन हात करून लढताना पोलीस अधिकारी असलेल्या माधवीला नक्की कोणत्या अडचणीतून जावं लागतं ते या सिनेमात दाखवण्यात आल आहे. हा विषय आणि त्याची मांडणी हे तुम्हाला वास्तव जगाच्या जवळ नेणार असल्याने ते पडद्यावर पहायला तुम्हाला नक्की आवडेल, असा विश्वास मुक्ताने ईटीव्ही भारतशी बोलताना व्यक्त केला आहे.