मुंबई- डॉ. सलील कुलकर्णी लिखित आणि दिग्दर्शित 'वेडिंगचा शिनेमा' या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. या सिनेमाच्या ट्रेलरला प्रेक्षकांनी सोशल मीडियावर चांगलीच पसंती दिली. सिनेमातील विनोदी संवाद आणि फ्रेश लूक इतकीच चर्चा आहे ती या सिनेमाच्या कास्टिंगची आणि त्यासाठी डॉ.सलील कुलकर्णी यांना मदत केली आहे त्यांची मैत्रीण आणि या सिनेमाची अभिनेत्री मुक्ता बर्वेने.
या सिनेमाची कथा सलील यांनी सुरुवातीला ज्या लोकांना ऐकवली त्यात मुक्ताचा समावेश होता. ही कथा लिहितानाच सलील यांच्या डोक्यात काही लोक निश्चित होते. मात्र ही कथा ऐकल्यावर मुक्ताने सलीलला कास्टिंग साठी काही सल्ले दिले आणि त्यानुसार त्यांनी ज्यांना ज्यांना विचारलं ते सगळेजण आज या सिनेमाचा भाग आहेत. मुक्ता या सिनेमात एका वेडिंग फिल्म दिग्दर्शिकेची भूमिका करते. तर भाऊ कदम हा तिच्या कॅमेरामन म्हणजेच डीओपीच्या भूमिकेत आहे. प्रवीण तरडे हिरोच्या मित्राच्या भूमिकेत आहे.