मुंबई -आपल्या दमदार अभिनयाने अवघी मराठी सिनेसृष्टी गाजवणारे अभिनेते मोहन जोशी 'सिनिअर सिटीझन' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या चित्रपटात त्यांनी एका निवृत्त लष्कर अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. यामध्ये त्यांचे काही अॅक्शन सीन्सही आहेत. त्यामुळे त्यांच्या रफ अँड टफ लूकची चर्चा सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळते.
मोहन जोशी यांनी 'सिनियर सिटीझन' चित्रपटात 'अभय देशपांडे' हे पात्र साकारत आहेत. मुळात त्यांच्या भारदस्त आणि करारी व्यक्तिमत्वामुळे त्यांच्यासाठी ही भूमिका साकारणे तितके आव्हानात्मक नव्हते. मात्र, 'रफ अँड टफ' व्यक्तिमत्व साकारताना त्यांनी थोडी मेहनत घेतली आहे. ही भूमिका नैसर्गिक वाटावी, म्हणून त्यांनी जिममध्ये जाऊन व्यायाम केला, बॉक्सिंगचे धडे घेतले. तसेच, त्यांच्या डाएटमध्येही बदल केला. देहबोली, बोलण्या-चालण्यातील रुबाबरदारपणा, स्वास्थ्य या सगळ्या गोष्टींवर त्यांनी विशेष लक्ष दिले.
हेही वाचा -'डंके की चोटपर बजेगा नारा', 'तान्हाजी'चं 'शंकरा रे शंकरा' गाणं प्रदर्शित
आपल्या या मेहनतीविषयी मोहन जोशी म्हणतात,'एखादा लष्कर अधिकारी निवृत्त झाल्यानंतरही त्याची लष्करातील जीवनशैलीच जगत असतो. खरंतर ही शिस्त त्याच्या नसानसातच भिनलेली असते. त्यामुळे हा निडरपणा माझ्यात आणण्याचा प्रयत्न केला. जी भूमिका मी स्वीकारतो, त्या भूमिकेचा मी अभ्यास करतो. या भूमिकेसाठी कोणते गुण आवश्यक आहेत, ते मी माझ्यात उतरवण्याचा प्रयत्न करतो. कारण एक कलाकार म्हणून ते खूप गरजेचे आहे. त्यामुळे अभय देशपांडे साकारताना मी स्वास्थ्याकडे जास्त लक्ष दिले.