मुंबई - प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला प्रतिष्ठीत समजला जाणाऱ्या 'पद्मश्री' पुरस्काराची घोषणा झाली आहे. यामध्ये कलाक्षेत्रातील बऱ्याच कलाकारांना 'पद्मश्री' पुरस्कार जाहीर झाला आहे. यामध्ये सुरेश वाडकर, कंगना रनौत, अदनान सामी, एकता कपूर आणि करण जोहर यांचा समावेश आहे. या कलाकारांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मात्र, मूळ भारतीय नसलेल्या अदनान सामीला पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्यामुळे मनसेकडून विरोध करण्यात आला आहे.
अदनान सामीला 'पद्मश्री' देण्यास मनसेचा तीव्र विरोध
मनसे चित्रपटसेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी आपल्या ट्विटच्या माध्यमातून अदनान सामीला जाहीर झालेल्या पुरस्काराबद्दल निषेध व्यक्त केला आहे.
मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी आपल्या ट्विटच्या माध्यमातून अदनान सामीला जाहीर झालेल्या पुरस्काराबद्दल निषेध व्यक्त केला आहे. '२०१५ मध्ये म्हणजे मोदींच्याच काळात त्याला भारतीय नागरिकत्व मिळालं आणि लगेच चार वर्षात त्याला पद्मश्रीही बहाल केला. त्याला एवढं लिफ्ट करण्याचं कारण काय?', असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे.
'मूळ भारतीय नागरिक नसलेल्या अदनान सामीला भारत सरकारने कोणताही पुरस्कार देऊ नये,हे मनसे च ठाम मत आहे. त्यामुळे त्याला बहाल केलेल्या पद्मश्री पुरस्काराचा मनसेकडून तीव्र शब्दात निषेध. अदनान सामीला जाहीर झालेला पद्म पुरस्कार त्वरित रद्द करण्यात यावा ही मनसेची मागणी आहे', असेही त्यांनी आपल्या दुसऱ्या ट्विटमध्ये लिहिले आहे.