मुंबई -बॉलिवूड अभिनेता अजय देवगन सध्या 'तान्हाजी - द अनसंग वॉरिअर' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. १० जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. याशिवाय 'सूर्यवंशी' चित्रपटातही त्याची झलक पाहायला मिळणार आहे. तर, 'भूज द प्राईड ऑफ इंडिया' या चित्रपटात तो मुख्य भूमिका साकारत आहे. नुकताच या चित्रपटातील त्याचा फर्स्ट लूक समोर आला आहे.
अभिषेक दुधैय्या हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे. १४ ऑगस्ट २०२० ला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
वरुण धवन आणि सारा अली खान यांच्या 'कुली नंबर वन' चित्रपटाचं नवं पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. डेव्हिड धवन हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे. जॅकी भगनानी आणि दीपशिखा देशमुख यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. १ मे २०२० ला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
दीपिका पदुकोणची मुख्य भूमिका असलेल्या 'छपाक' चित्रपटाचंही नवं पोस्टर समोर आले आहे. १० जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. अभिनेता विक्रांत मेस्सीची देखील यामध्ये महत्वपूर्ण भूमिका पाहायला मिळणार आहे. मेघना गुलजार यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.
या चित्रपटासमोर 'तान्हाजी - द अनसंग वॉरिअर' या चित्रपटाचं तगडं आव्हान आहे. त्यामुळे नववर्षाच्या सुरुवातीलाच बॉक्स ऑफिसवर तगडी टक्कर पाहायला मिळेल.
- 'मिशन मंगल'ची हाँगकाँग वारी
अक्षय कुमार, विद्या बालन, तापसी पन्नु, सोनाक्षी सिन्हा, क्रिती कुल्हारी, शरमन जोशी, नित्या मेनन यांची भूमिका असलेला 'मिशन मंगल' हा चित्रपट मागच्या वर्षी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. आता हा चित्रपट हाँगकाँग येथे प्रदर्शित केला जाणार आहे. फॉक्स स्टार स्टुडिओ अंतर्गत या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली होती. आज २ जानेवारीला हा चित्रपट हाँगकाँगच्या चित्रपटगृहात झळकला आहे. 'कँन्टोनिझ' सबटायटल्ससोबत हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचं लोकल पोस्टर सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहे.
- दिग्दर्शक इम्तियाज अलींचे ५ चित्रपट होणार प्रदर्शित
इम्तियाज अली यंदा ५ चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये 'अंग्रेजी मीडियम' (मार्च), 'रुही अफ्जा' (एप्रिल), 'मीमी' (जुलै) आणि 'शिद्दत' (सप्टेंबर) या चित्रपटांचा समावेश आहे. फेब्रुवारी महिन्यातही त्यांचा एक चित्रपट प्रदर्शित होणार आहे. अद्याप या चित्रपटाचे नाव ठरले नाही.
दिनेश विजन हे देखील त्यांच्या आगामी चित्रपटाची घोषणा करणार आहेत.