'मिस वर्ल्ड' मानुषी छिल्लरची लवकरच मोठ्या पडद्यावर एन्ट्री, अक्षय कुमारसोबत साकारणार भूमिका - Manushi Chillar in prithviraj
मानुषी देखील मोठ्या पडद्यावर एन्ट्री करण्यासाठी एका दमदार कथानकाच्या शोधात होती. बऱ्याच दिवसांपासून ती बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार असं बोललं जात होतं.
मुंबई -मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर लवकरच मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारसोबत तिची मुख्य भूमिका पाहायला मिळणार आहे. अक्षय कुमारच्या आगामी 'पृथ्वीराज' या चित्रपटात ती भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाच्या शूटिंगपूर्वी चित्रपटाचे दिग्दर्शक चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी पूजेचे आयोजन केले होते. या पूजेमध्ये मानुषीनेही हजेरी लावली होती.
यश राज प्रोडक्शनच्या बॅनरअंतर्गत राजा पृथ्वीराज चौहान यांच्या जीवन कथेवर आधारित 'पृथ्वीराज' या चित्रपटाची निर्मिती करण्यात येत आहे. या चित्रपटात अक्षय कुमार 'पृथ्वीराज' यांच्या भूमिकेत झळकणार आहे. काही महिन्यांपूर्वीच या चित्रपटाची घोषणा करुन अक्षयचा फर्स्ट लूकही पाहायला मिळाला होता. आता त्याच्यासोबत मानुषी छिल्लरचीही महत्वपूर्ण भूमिका असल्याचं स्पष्ट झालं आहे.
मानुषी या चित्रपटात 'संयोगीता' ही भूमिका साकारताना दिसणार आहे. संयोगीता ही अतिशय सुंदर, धाडसी आणि साहसी स्त्री होती. तिच्या भूमिकेला मानुषी योग्य न्याय देऊ शकेल, असे दिग्दर्शक चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी म्हटले आहे.