लखनऊ -मिर्झापूर हा उत्तर प्रदेशातील एक जिल्हा आहे. वाराणसीप्रमाणेच मिर्झापूर हे विंध्याचल नावाने प्रसिद्ध आहे. येथे विंध्यवासीनी देवीचे मंदिर असून लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात. नैसर्गिक सौंदर्याने परिपूर्ण असलेल्या या ठिकाणी भक्ती आणि शांतीचा अनुभव मिळतो. प्रत्यक्षात मिर्झापूर असे असताना त्याला मालिकेमध्ये अपराधांचा अड्डा का दाखवले आहे? असा प्रश्न स्थानिक नागरिक आणि नेते करत आहेत. आतापर्यंत सामाजिक कार्यकर्ते, विनोदी अभिनेता राजू श्रीवास्तव, माजी केंद्रीय मंत्री आणि मिर्झापूरच्या खासदार अनुप्रिया पटेल यांनी या वेब सीरिजला विरोध केला आहे.
मिर्झापूरमधून निश्चित होते भारताची अंतरराष्ट्रीय प्रमाणवेळ -
प्रत्येक देशाची स्वत:ची एक प्रमाणवेळ असते. भारताची प्रमाणवेळ मिर्झापूरमधून निश्चित होते. मिर्झापूर जिल्ह्यातील अमरावती चौकातून ही प्रमाणवेळ निश्चित केली गेली आहे. मिर्झापूर "लाल स्टोन"साठीही प्रसिद्ध आहे. प्राचीन काळात या दगडांचा वापर मौर्य सम्राट अशोकाने बौद्ध स्तुप आणि अशोक स्तंभ तयार करण्यासाठी केला होता.
मिर्झापूरमध्ये आहेत विविध पर्यटन स्थळे -
विंध्याचल, अरवली आणि नीलगिरी पर्वतरांगांनी वेढलेले हे ठिकाण विंध्य नावाने ओळखले जाते. येथील चुनार किल्ला प्रसिद्ध आहे. या व्यतिरिक्त गंगा नदी, सीताकुंड, लाल भैरव मंदिर, मोती तलाव, टांडा धबधबा, विंडम धबधबा, खडजा धबधबा, लखनिया दरी, चुनादरी, सिरसी बंधारा, बकरिया धबधबा, तारकेश्वर महादेव, महात्रिकोण शिवपूर, गुरुद्वारा, गुरुवार्ता बाग आणि रमेश्वर, देवरहवा बाबा आश्रम आदि ठिकाणे प्रसिद्ध आहेत. या ठिकाणांना भेटी देण्यासाठी पर्यटक येतात.