मुंबई - प्रेक्षकांना नेहमीच चित्रपटांमधून निरनिराळ्या जोड्या बघायला आवडतात. हिरो-हिरॉईन, सहअभिनेता-सहअभिनेत्री किंवा आई वडील या जोड्यांत वैविध्य असलेलं प्रेक्षकांना रुचतं. काही कलाकारांच्या जोडया या चित्रपटाच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असतात. प्रेक्षकांनाही त्यांना एकत्र पहाण्यात मजा येते. तर काही नवीन जमलेल्या जोडया आपल्या एकत्र येण्यातून उत्सुकता निर्माण करत असतात. अशीच एक जोडी आगामी ‘चाबुक’ चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. ही जोडी आहे अभिनेता मिलिंद शिंदे आणि प्रसिद्ध सूत्रसंचालक सुधीर गाडगीळ यांची. 'चाबुक'मध्ये मिलिंद शिंदे आणि सुधीर गाडगीळ यांनी साकारलेल्या व्यक्तिरेखांमध्ये गुरु-शिष्याचं नातं पहायला मिळणार आहे. आता यापैकी कोण कोणाचा गुरू आणि कोणी कोणाचं शिष्यत्व पत्करलंय हे 'चाबुक' पाहिल्यावरच समजेल.
अभिनेता मिलिंद शिंदे यांनी राष्ट्रीय पारितोषिक विजेत्या चित्रपटांपासून ते लघुपटांपर्यंत असंख्य कलाकृतींमध्ये आपले अभिनय कौशल्य सिद्ध केले आहे. व्यक्तिरेखा कोणतीही असो ती सफाईदारपणे साकारण्यात मिलिंद शिंदे यांचा हातखंडा आहे. सूत्रसंचालनाच्या दुनियेत आपला भरीव ठसा उमटवणारे सुधीर गाडगीळ मात्र 'चाबुक'च्या निमित्ताने प्रथमच चित्रपटात अभिनय करताना दिसणार आहेत. आपापल्या क्षेत्रात दिग्गज असणारे मिलिंद शिंदे आणि सुधीर गाडगीळ या चित्रपटात सूत्रधाराच्या भूमिकेत झळकणार आहेत. यांनी साकारलेल्या व्यक्तिरेखा काहीशा वेगळ्या असून, या व्यक्तिरेखांची काहीशी अनोखी नावं मुद्दाम गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहेत.
हेही वाचा -तेजस्वी प्रकाशने सांगितले 'नागिन' फ्रँचायझी हिट होण्याचे कारण