डोक्यात सिनेनिर्मितीची झिंग असलेल्या अमर देवकर यांनी 2014 साली 'म्होरक्या' हा सिनेमा बनवायला घेतला, मात्र सुरुवातीपासून या सिनेमाला अनेक अडचणींना समोर जावं लागलं. मात्र 2018 साली या प्रामाणिक कष्टाला फळ मिळालं आणि या सिनेमाला तीन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. यात सर्वोत्कृष्ट सामाजिक सिनेमासह सर्वोत्कृष्ट बालकलाकाराच्या पुरस्काराचा समावेश होता. मात्र त्याच वर्षी दिल्लीतील राष्ट्रीय चित्रपट वितरण सोहळ्यात सर्व पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते मिळणार नसल्याने वादच गालबोट लागलं आणि अमर देवकर यांनी या पुरस्कार सोहळ्यावर बहिष्कार कायम ठेवला. अखेर त्यांचे राष्ट्रीय पुरस्कार त्याना पोस्टाने पाठवण्यात आले.
'शेवटी दोन एकर शेती गहाण टाकली आणि 'म्होरक्या'चं पोस्ट प्रोडक्शन पूर्ण केलं'
निर्मिती पासून रिलीज पर्यंत संघर्ष पाचवीला पुजलेला असलेल्या दिग्दर्शक अमर देवकर यांचा 'म्होरक्या' हा सिनेमा अखेर रिलीज होतोय. येत्या 24 जानेवारी रोजी हा सिनेमा आपल्या भेटीला येणार आहे.
'म्होरक्या' या सिनेमातून त्यानी धनगर समाजातील एका मुलाने शाळेच्या परेडमध्ये म्होरक्या होण्याचं स्वप्न उराशी बाळगलेले असतं. मात्र वेगवेगळ्या कारणामुळे त्याच हे स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही अखेर हे स्वप्न तो नक्की कस पूर्ण करतो ते या सिनेमाद्वारे दाखवण्यात आलेलं आहे. विशेष म्हणजे 'म्होरक्या'ला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करताना ख्यातनाम दिग्दर्शक शेखर कपूर यांनी या सिनेमातील लहानग्या मुलाच्या डोळ्यात ग्रामीण भारताचं खर चित्र दिसतं अशी पोचपावती दिली होती.
सिनेमाच चित्रीकरण पूर्ण झाल्यावर अचानक निर्मात्याने हात काढून घेतल्याने दिग्दर्शक अमर देवकर यांनी स्वतःची दोन एकर जमीन विकून या सिनेमाचं पोस्ट प्रोडक्शन पूर्ण केलं आहे. मुंबईतील अनेक नामांकित कंपन्यांनी देखील 'म्होरक्या' रिलीज करायला नकार दिला आहे. त्यामुळे अखेरीस आपल्या मित्रांच्या साथीने ते हा सिनेमा येत्या 24 जानेवारी रोजी रिलीज करतायत. त्यांच्या या प्रयत्नाला नक्की यश मिळावं अशीच प्रत्येक सिनेप्रेमींची इच्छा आहे.