मुंबई - बहुप्रतिक्षीत 'स्टूडंट ऑफ द ईअर-२' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. मात्र, चित्रपटाच्या ट्रेलरवर नेटकरी मजेशीर प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. काही जणांना हा ट्रेलर आवडत आहे, तर काहीजणांनी या ट्रेलरची खिल्ली उडविली आहे. सोशल मीडियावर या चित्रपटाच्या ट्रेलरवर बरेचसे मिम्स व्हायरल होत आहेत.
चित्रपटाचा ट्रेलर पाहून नेटकऱ्यांनी चित्रपटासह करण जोहरचीही खिल्ली उडविली आहे. करण जोहरने अशी कॉलेज लाईफ तयार केली आहे, ज्यामध्ये अभ्यास सोडून विद्यार्थी सर्वकाही करताना दिसतात, असे नेटकऱ्यांनी म्हटले आहे. 'स्टूडंट ऑफ द ईअर' प्रमाणेच हा देखील चित्रपट तसाच असणार, फक्त आधीच्या चित्रपटात दोन हिरो होते, यात दोन अभिनेत्रींचा समावेश आहे, असे काहीजणांनी म्हटले आहे.
करण जोहरच्या चित्रपटात काहीही घडू शकते, अशाही प्रतिक्रिया आलेल्या आहेत. एकंदर प्रतिक्रिया पाहता, बऱ्याचजणांना हा ट्रेलर रुचलेला दिसत नाही. टायगरला आणखी अभिनय शिकण्याची गरज असल्याचेही काही नेटकऱ्यांनी म्हटले आहे. काहीजणांना त्यांनी या ट्रेलरसाठी दिलेले ३ मिनिटे परत हवे आहेत. तर काहीजणांनी आपले ३ मिनिट वाया गेल्याचे व्यक्त केले आहे.
या चित्रपटातून तारा सुतारीया आणि अनन्या पांडे बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत. आता त्यांचा पहिल्याच चित्रपटाला प्रेक्षक आणखी कसा प्रतिसाद देतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.