महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

मराठीतील रोमँटिक हिरो स्वप्नील जोशी करतोय हॉरर चित्रपट, ‘बळी’! - Swapnil Joshi is acting in the horror film 'Bali

अभिनेता स्वप्नील जोशी आता 'बळी' या हॉरर चित्रपटातून दिसणार आहे. ‘लपंडाव’ या अनेक पुरस्कार विजेत्या चित्रपटाचे दिग्दर्शक विशाल फुरिया ‘बळी’ चे दिग्दर्शन करीत असून ‘जीसिम्स’ने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. नुकतेच या बहुप्रतीक्षित हॉरर चित्रपट ‘बळी’ च्या मोशन पोस्टरचे केले अनावरण करण्यात आले.

Swapnil Joshi
स्वप्नील जोशी

By

Published : Mar 5, 2021, 12:05 PM IST

मुंबई - आपल्या रोमँटिक भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेला, चॉकोलेट हिरो, स्वप्नील जोशी आता हॉरर चित्रपटातून दिसणार आहे. ‘लपंडाव’ या अनेक पुरस्कार विजेत्या चित्रपटाचे दिग्दर्शक विशाल फुरिया ‘बळी’ चे दिग्दर्शन करीत असून ‘जीसिम्स’ने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. नुकतेच या बहुप्रतीक्षित हॉरर चित्रपट ‘बळी’ च्या मोशन पोस्टरचे केले अनावरण करण्यात आले. चित्रपटाच्या मोशन पोस्टरमध्ये एका व्यक्तीचा भीतीदायक चेहरा रक्त आणि डोळ्यांत क्रॉसच्या प्रतिमा असलेल्या वातावरणात दर्शविले गेले आहे. हे भीतीदायक पटकथेची जाणीव देते ती (एलिझाबेथ कोण आहे) च्या टॅग लाइनसह , त्यातून अघटीत आणि भितीपूर्ण वातावरणाचे सुतोवाच होते. ‘बळी’ हा ‘लपाछपी’पेक्षाही अधिक भीतीदायक आणि थ्रिलिंग असेल, अशी हमी मी प्रेक्षकांना देवू शकतो, असे विशालने सांगितले. या हॉरर मराठी चित्रपटाचा मोठ्या प्रमाणावर बोलबाला आहे.

या चित्रपटाबद्दल स्वप्निलला खूप उत्सुकता आहे. तो म्हणाला, “यंदा मी नव्या प्रकारातील चित्रपट करेन, असे आश्वासन गेल्यावर्षी मी प्रेक्षकांना दिले होते. त्या दृष्टीने मी उचललेले हे एक पाऊल आहे. हॉरर चित्रपट करण्याची संधी मला मिळते आहे, हे मी माझे भाग्य समजतो. ते करत असताना कार्तिक, अर्जुन यांच्यासारखे माझे आवडते निर्माते मला मिळाले आणि त्याचवेळी माझा लाडका दिग्दर्शक विशाल हा चित्रपट दिग्दर्शित करतो आहे. मला पूर्ण खात्री आहे की, आम्ही एकत्रितपणे प्रेक्षकांना घाबरवू शकतो. या चित्रपटाची कथा आणि पटकथा भीतीदायक आहे आणि त्यातून प्रेक्षकांना काही धडकी भरवणारे प्रसंग पडद्यावर अनुभवता येतील याची ग्वाही मी देतो.”

या चित्रपटाबद्दल बोलताना दिग्दर्शक विशाल फुरिया म्हणाले, “लपाछपी’ला मराठी प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि त्यांना हॉरर चित्रपट आवडतात, हे दाखवून दिले. अर्जुन आणि कार्तिक यांच्यासारखे उत्तम निर्माते या माझ्या दुसऱ्या हॉरर चित्रपटाला लाभले आहेत. या चित्रपटासाठी मला स्वप्निलसारखा स्टार मिळाला आहे. त्याला मराठी प्रेक्षकांकडून नेहमीच चांगले प्रेम मिळाले आहे. मला असे वाटते की, एक अभिनेता म्हणून स्वप्नीलची प्रतिभा आतापर्यंत म्हणावी तशी वापरली गेली नाही. त्याला भेटल्यानंतर मला पूर्ण खात्री झाली की, तो या भूमिकेसाठी अगदी योग्य आहे. त्याशिवाय तो एक स्टार आहे आणि त्यामुळे आमचा हा चित्रपट सर्वसामान्यापर्यंत पोहोचायला मदतसुद्धा होईल.”

“बळी’च्या माध्यमातून आम्हाला नवीन प्रकार हाताळायला मिळतो आहे, याचा आम्हाला अतिशय आनंद आहे. हॉरर चित्रपट म्हटला की विशाल फुरियापेक्षा आणखी चांगला पर्याय काय असू शकतो? त्यांचा ‘लपाछपी’ हा अलीकडच्या काळातील एक सर्वोत्तम हॉरर चित्रपट आहे. त्याशिवाय मराठी चित्रपटक्षेत्रातील एक सर्वोत्तम नट स्वप्निल जोशी या चित्रपटात मध्यवर्ती भूमिकेत आहे. त्याच्यासाठीसुद्धा वेगळा प्रकार हाताळण्याची ही एक संधी होती व त्याने ती उत्तम प्रकारे कॅश केलीय”, असे उद्गार निर्माते आणि जीसिम्सचे प्रमुख अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक डी निशाणदार यांनी काढले.

या चित्रपटाची निर्मिती जीसिम्सने केली आहे. त्यांनी ‘मोगरा फुलाला’, ‘बोनस’ आदी गाजलेले मराठी चित्रपट आणि ‘समांतर-१’ आणि ‘समांतर-२’ तसेच ‘नक्सलबारी’ यांसारख्या वेबसिरीजची निर्मिती केली आहे. त्यांची निर्मिती असलेला ‘बळी’ हा चित्रपट १६ एप्रिल २०२१ रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार.

ABOUT THE AUTHOR

...view details