महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jan 30, 2020, 8:28 AM IST

ETV Bharat / sitara

शतकमहोत्सवी नाट्य संमेलनाची २७ मार्चला सांगलीत 'नांदी',१४ जूनला मुंबईत होणार सांगता

२७ मार्च रोजी जागतिक रंगभूमी दिनाचा मुहूर्त साधत प्रत्यक्ष नाट्य संमेलनाला सुरुवात होईल. त्यानंतर २९ मार्च पर्यंत सांगलीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

Marathi Natya Sammelan will start on 27th march in Sangli
शतकमहोत्सवी नाट्य संमेलनाची २७ मार्चला सांगलीत 'नांदी',१४ जूनला मुंबईत होणार सांगता

मुंबई -शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाची रूपरेषा अखेर ठरली आहे. या शतकमहोत्सवी नाट्य संमेलनाची नांदी सांगलीत घुमणार असून १४ जून रोजी मुंबईत या संमेलनाची सांगता होणार आहे. हे नाट्य संमेलन मराठी रंगभूमीच्या दैदीप्यमान परंपरेला साजेसे ठरावे, यासाठी या महोत्सवात अनेक गोष्टींचा समावेश करण्यात येणार आहे.

शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाची रूपरेषा अखेर ठरली.

२५ मार्च रोजी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नाट्य परिषदेचे सदस्य तामिळनाडूतील तंजावार येथे जाऊन महाराज व्यंकोजीराजे भोसले यांच्या समाधीवर नतमस्तक होऊन कार्यक्रमांना सुरवात करणार आहेत. त्यानंतर २६ मार्च रोजी सांगलीत नाट्यदिंडीचे आयोजन करून त्यानंतर तिथे संगीत नाटकाला सुरुवात करण्यात येईल.

२७ मार्च रोजी जागतिक रंगभूमी दिनाचा मुहूर्त साधत प्रत्यक्ष नाट्य संमेलनाला सुरुवात होईल. त्यानंतर २९ मार्च पर्यंत सांगलीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

२९ मार्च नंतर मात्र हे नाट्य संमेलन नाट्य परिषदेच्या १० ते १२ शाखांच्या माध्यमातून राज्यातील वाडी वस्तीपर्यंत नेण्याचा आयोजकांचा मानस आहे. स्थानिक शाखांच्या मदतीने जिल्हा किंवा तालुका पातळीवर स्थानिक नाट्य कलावंतांची नाटकं, एकपात्री सादरीकरण, दिघांक, एकांकिका यांचे वेगवेगळ्या ठिकाणी सादरीकरण होईल. लोकांना या कार्यक्रमाचा आस्वाद घेता यावा, यासाठी शनिवार रविवार आणि जोडून येणाऱ्या सुट्ट्यांच्या दिवशी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यातील सर्वोत्कृष्ट सादर झालेल्या कलाकृतींना नंतर मुंबईत पुन्हा नव्याने सादरीकरण करण्याची संधी देण्यात येईल. यातील उत्तम कार्यक्रम निवड आणि वैविध्यपूर्ण आयोजनासाठी शाखांना ५ विशेष पुरस्कार देण्यात येतील.

७ जूनपर्यंत राज्यव्यापी संमेलन पार पडल्यानंतर ८ जूनपासून मुंबईत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय नाटकांचा खास महोत्सव पार पडेल. यात पारंपरिक नाटक, लोककला, नाट्यविषयक चर्चा, परिसंवाद यांनाही खास स्थान देण्यात येईल. त्यासोबतच या काळात व्यावसायिक, प्रायोगिक, बालनाट्य, एकांकिका, एकपात्री यांचेही विशेष सादरीकरण करण्यात येईल. १४ जून रोजी अखिल भारतीय नाट्य परिषदेतर्फे दरवर्षी गो. ब. देवल स्मृती पुरस्कारांचे वितरण करण्यात येत. याच पुरस्कार वितरण सोहळ्यासह नाट्य संमेलनाची देखील सांगता करण्यात येईल.

हा फक्त या नाट्य संमेलनाचा पहिला टप्पा असून दुसऱ्या टप्प्यात १४ जूननंतर बेळगाव, गोवा, बडोदा, इंदूर, हैदराबाद, दिल्ली यांसारख्या शहरातही विशेष कार्यक्रम आयोजित करून तेथील प्रेक्षकांना या सोहळ्यात सामावून घेण्याचा आयोजकांचा प्रयत्न आहे. याच प्रमाणे परदेशात देखील कार्यक्रम व्हावेत यासाठी प्रयत्नशील रहाणार असल्याचे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितलं आहे.

१०० व्या नाट्य संमेलनाची ही फक्त रूपरेषा असून प्रत्यक्ष त्यात कोणकोणते कार्यक्रम पहायला मिळणार, त्यांचं वैशिष्ट्य काय असेल, ते येत्या काही दिवसात स्पष्ट करण्यात येणार असल्याचे नाट्य परिषदेने सांगितलं आहे. त्यामुळे डॉ. जब्बार पटेल यांच्या अध्यक्षतेखाली होणारे हे संमेलन त्याच्या कक्षा खऱ्या अर्थाने रुंदावणार, यात काहीही शंका नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details