चमचमत्या दुनियेत काहीतरी करून दाखवण्याचं स्वप्न उराशी घेऊन संजय जाधव यांनी मराठी सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं. मात्र खऱ्या अर्थी त्याची सुरुवात झाली ती विनय आपटे यांच्या 'आभाळमाया' या मालिकेद्वारे या मालिकेचे कॅमेरामन म्हणून संजय नावारूपाला आले. त्यानंतर 'झी'ची पहिली सिनेनिर्मिती असलेल्या 'साडे माडे तीन' हा सिनेमा त्यांनी चित्रित केला. पुढे त्यांनी स्वतः दिग्दर्शनाची धुरा हातात घेऊन बनवलेल्या 'दुनियादारी' या सिनेमा ब्लॉकबस्टर ठरला. आणि त्यानंतर आता 'खारी बिस्कीट' हा आपला 50 वा सिनेमा आपल्या भेटीला ते घेऊन येतायत.
'हृदयाच्या जवळची गोष्ट होती म्हणूनच बनवला खारी बिस्कीट' - संजय जाधव - Sanjay Jadhav special interview
संजय जाधव दिग्दर्शित 'खारी बिस्कीट' हा सिनेमा येत्या 1 नोव्हेंबर रोजी रिलीज होतोय. संजय यांच्या करिअरमधील हा त्यांचा 50 व सिनेमा आहे. त्यामुळेच त्यांचा आणि संबंध इंडस्ट्रीचा या सिनेमाकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे.
एरवी मराठीतील सर्वच सुपरस्टार्सचे मित्र म्हणून ओळखले जाणारे संजय जाधव यावेळी मात्र दोन लहान मुलांच भावविश्व मांडणारी गोष्ट घेऊन आलेले आहेत. बिस्कीट म्हणजेच एक भाऊ आणि त्याची लाडकी बहीण खारी ही रस्त्याच्या कडेला राहून आयुष्य जगणारी अनाथ मुलं, पण बिस्कीटच्या आयुष्यात खारीचं फार महत्व आहे. तिला कोणतीही गोष्ट कमी पडू नये आणि तिला हवं ते मिळावं यासाठी वाट्टेल ते करायला हा भाऊ तयार असतो. त्यातूनच ही खारी एक अशी गोष्ट मागते जी देणं बिस्कीटच्या आवाक्याबाहेरचं असतं. मात्र जिद्दीने पेटून ती गोष्ट तो तिला कशी मिळवून देतो. ते या सिनेमात दाखवण्यात आलेलं आहे.
हृदयाच्या खूप जवळची वाटल्याने आपण ही गोष्ट प्रेक्षकांसमोर मांडण्याचा निर्णय घेतल्याचे संजय जाधव यांनी ई टीव्ही भारत शी बोलताना सांगितले आहे. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एक तरी व्यक्ती नक्की असते की जिच्यासाठी आपण काहीही करायला तयार असतो. नेमकी तीच भावना या सिनेमातून मांडली असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. त्यांच्याशी संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी विराज मुळे यांनी..